नाशिकरोड : परिसरात सुरू असलेला साथीच्या रोगामुळे खासगी रुग्णालयांकडून उपचाराच्या नावाखाली रुग्णांची होणारी पिळवणूक थांबवावी. तसेच बिटको रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी विद्यार्थी सेनेच्या वतीने मनपा विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिकरोड परिसरात सध्या साथीच्या रोगामुळे रुग्णांची संख्या वाढली आहे. खासगी रुग्णालयांकडून अनेक रुग्णांकडून अनावश्यक तपासण्या करण्याचे सांगून आर्थिक पिळवणूक करण्यात येत आहे. तसेच बिटको रुग्णालयात विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर संदेश लवटे, श्रीकांत मगर, आकाश काळे, अजिंक्य गायधनी, आकाश उगले, विकास पाटील, बंटी मोरे, राहुल सानप, ऋषिकेश नेहे, गौरव घाडगे आदींच्या सह्या आहेत. रुग्णांकडून जादा शुल्क आकारणी करणाऱ्या पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई करावी. ठराविक लॅबमधूनच चाचणी करण्याची सक्ती करण्यात येते. पॅथॉलॉजी लॅबमध्ये चाचणीचे दरपत्रक लावण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
विद्यार्थी सेनेच्या वतीने नाशिकरोडला निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 01:03 IST