दिंडोरी : निगडोळ प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेदरम्यान सोनाली धुळे या महिलेचा मृत्यू झाला. याची त्वरित सखोल चौकशी व्हावी अशी मागणी संतोष रहेरे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, आदिवासी विकासमंत्री, वैद्यकीय मंत्री, पालक मंत्री आदिंना देण्यात आल्या आहे.सोनाली धुळे यांना निगडोळ प्राथमिक आरोग्य केंद्रात संतती नियमन शस्त्रक्रियेसाठी दाखल केले असता आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे सोनाली धुळे या महिलेस आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप होत आहे. याबाबतची माहिती घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या दालनात गेलो असता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वाघचौरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कोशिरे व त्यांचे सहकारी हे मयत सोनाली धुळे यांच्या मृत्यू प्रकरणाविषयी चर्चा करीत असताना आदिवासी समाजाला गलिच्छ भाषेत शिवीगाळ करीत होते असा आरोप रहेरे यांनी केला आहे. हे सर्वजण शस्त्रक्र या करणारे डॉ.निकम व डॉ.शेवाळे यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत असून तरी संबंधितांवर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी अशी मागणी संतोष रहेरे यांनी केली. (वार्ताहर)
माता मृत्यू प्रकरणाच्या चौकशीची मागणी
By admin | Updated: June 10, 2016 00:06 IST