----
ग्रामीण भागात कांदाकाढणीची लगबग
मालेगाव : तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या कांदाकाढणीची लगबग दिसून येत आहे. मजूरटंचाईमुळे शेतकरी हतबल झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बाहेरगावाहून मजूर येण्यास टाळाटाळ करीत आहेत. परिणामी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घरच्याघरीच कांदेकाढणी सुरू केली आहे. बाजारपेठा बंद असल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदाचाळीत साठवणुकीवर भर दिला आहे.
-----
संचारबंदीमुळे रस्ते पडू लागले ओस
मालेगाव : राज्य शासनाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू केली आहे. परिणामी, उन्हाची तीव्रता व संचारबंदीमुळे दुपारच्या सत्रात रस्ते ओस पडू लागले आहेत. शहरात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू आहे. दुपारच्या सत्रात भाजीपाला बाजारही बंद असतो. त्यामुळे मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत आहे. नागरिकांनी भीतीपोटी घराबाहेर पडणे टाळले आहे.
----
रमजानमुळे फळांच्या बाजारात तेजी
मालेगाव : सध्या मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सुरू आहे. उपवासाचा नववा दिवस झाला आहे. बाजारपेठेत उपवासासाठी लागणारी फळे उपलब्ध आहेत. मात्र, भाव वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. कोरोनामुळे फळे व्यावसायिक फळांची चढ्या दराने विक्री करीत आहेत.
----
कोरोना चाचणी अहवाल तातडीने देण्याची मागणी
मालेगाव : शहरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. खासगी व सरकारी कोविड सेंटरमध्ये खाटा शिल्लक नाहीत. सहारा रुग्णालय रुग्णांसाठी गैरसोयीचे ठरले आहे. कोविड सेंटरमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी. कोरोना चाचणी अहवाल तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे माजी आमदार आसीफ शेख यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
----
मालेगावी राम-रहीम कोविड सेंटरचा शुभारंभ
मालेगाव : गरजूंसाठी कोविड उपचार कक्ष सुरू करून बाराबलुतेदार मित्र मंडळाने सामाजिक बांधीलकी जोपासली असल्याचे प्रतिपादन कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केले. येथील भायगाव शिवारातील राम-रहीम कोविड उपचार केंद्राच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष बंडूकाका बच्छाव, डॉ. उज्ज्वल कापडणीस, अध्यक्ष कमलाकर पवार, संजय हिरे आदी उपस्थित होते.
----
बंद पथदीप सुरू करण्याची मागणी
मालेगाव : शहरातील टेहरे चौफुली परिसरात पथदीप गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. या भागात रात्री अंधाराचे साम्राज्य निर्माण होत असते. महापालिकेच्या विद्युत विभागाने बंद पडलेले पथदीप पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.