पांगरी : सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील पुलांचे कोसळलेले कठडे त्वरित दुरुस्त करण्याची मागणी वाहनचालक व प्रवाशांनी केली आहे. सिन्नर-शिर्डी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. त्यामुळे अपघातांच्या संख्येत झालेली वाढ चिंताजनक आहे. या मार्गावरील सर्वाधिक पूल पांगरी परिसरात आहेत. येथील पुलांवर झालेल्या अपघातांमुळे पुलाचे कठडे तुटले आहेत. त्याची अद्याप दुरुस्ती करण्यात आली नसल्याने पुन्हा अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच वाहन पुलावरून खाली कोसळून मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.या रस्त्याच्या रुंदीकरण कामात लाखो रुपये खर्चून पुलांची उभारणी करण्यात आली आहे. मात्र अल्पावधीतच पूल निकामी झाल्याने वाहनचालकांना रात्रीच्या वेळी धोका निर्माण झाला आहे. या परिसरातील बाबा ढाबा, जाम नदीवरील, पद्मावती नाला व लांडे ओढा या चार पुलांपैकी जवळपास सर्वच पुलांवरील कठडे तुटले आहेत. लांडे ओढा व बाबा ढाबा येथील कठडे तुटून अनेक दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र अद्याप त्यांची दुरुस्ती करण्यात आली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. सदर पुलांवरील कठडे लवकर बसवावेत, अशी मागणी प्रवासी व चालकांनी केली आहे.
पुलाचे कठडे बसविण्याची मागणी
By admin | Updated: December 6, 2015 22:26 IST