पिंपळगाव वाखारी : यंदाच्या भीषण दुष्काळी स्थितीत देवळा तालुक्याच्या पूर्वभागाला चणकापूर उजवा कालव्याच्या वाढीव कालव्यातून पाणी मिळू न शकल्याने पूर्वभागातील जनता आता पाण्यासाठी एकत्रितपणे संघटित होऊन लढा उभारण्याची तयारी करू लागली आहे. पूर्वभागाला पाणी देण्यासाठी वाढीव कालव्याची वहनक्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. शासकीय पातळीबरोबर राजकीय पातळीवरही याचा विचार होणे गरजेचे आहे. अन्यथा पूर्वभाग देवळा तालुक्याचे राजकीय समीकरणे बदलवू शकतो, असे जाणकारांचे मत आहे.देवळा तालुक्याच्या पूर्वभागात यंदा १९७२पेक्षाही भीषण दुष्काळ आहे. ह्या भागाला पावसाळ्यातील पूरपाणी देण्यासाठी चणकापूर उजवा कालव्याची रामेश्वर टँक ते झाडीपर्यंत वाढीव कालव्याची मंजुरी आहे. परंतु काम अद्याप अपुरे असून, धिम्यागतीने सुरू आहे. दहिवड गावापर्यंत कालव्याचे काम पूर्ण असले तरी गेल्या काही वर्षांपासून अत्यंत कमी असे पूरपाणी या भागाला पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात दिले जाते. यंदा तेसुद्धा मिळाले नाही. याला कारण चणकापूर उजवा कालव्याची वहनक्षमता असून, ती अत्यंत कमी आहे.रामेश्वर टँकपर्यंत ते फक्त ४० क्यूसेस येते असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कालव्याची वहनक्षमता वाढविणे गरजेचे असून, पूर्वभागात सर्व जनतेचे याबाबत एकमत आहे. यासाठी पूर्वभागातील प्रत्येक गावात गाव बैठका होऊन त्याबाबत लढा देण्यासाठी सगळ्या पूर्वभागाची तयारी आहे. जर पूर्वभागातील सर्व गावांनी एकत्रित येऊन पाण्यासाठी लढा दिला तर त्याचा विचार नक्कीच शासनस्तरावर करावा लागेल व जनतेच्या मागणीला गती देऊन कालव्याची वहनक्षमता वाढवावी लागेल. हक्काचे पूरपाणी देणे क्रमप्राप्त ठरेल. (वार्ताहर)
कालव्यांची वहनक्षमता वाढविण्याची मागणी
By admin | Updated: October 13, 2015 22:46 IST