नाशिक : अकोला नगरपालिकेत सफाई कामगाराने केलेल्या आत्मदहनाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, तसेच योगगुरू रामदेवबाबा यांनी दलित समाजाविषयी काढलेल्या अपशब्दांची चौकशी करून रामदेवबाबांवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमिटी मागासवर्ग विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, अकोला नगरपालिकेतील सफाई कामगारांना महिनोन्महिने वेतन अदा न केल्याने या कामगारांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत असून, उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत वेळोवेळी निवेदने देऊन व मागणी करूनही या कामगारांना वेतन मिळत नव्हते. त्यामुळे आर्थिक विवंचना व कुटुंबाच्या उपासमारीला कंटाळून येथील सफाई कामगार मोहन सका यांनी आत्मदहन केल्याचे निवेदनात म्हटले आहे. सफाई कामगारांवर अशी वेळ येण्याला नगरपालिकेतील अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर योगगुरू रामदेवबाबा यांनी दलितांविषयी अत्यंत घृणास्पद व दलितांना अपमानित करण्याचे वक्तव्य करून समस्त दलित समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. या दोन्ही प्रकरणांची शासनाने गंभीरपणे चौकशी करावी व रामदेवबाबांवर ॲट्रॅासिटीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर सुरेश मारू, अनिल बहोत, रमेश मकवाना, संजय गोईल, अनिल मकवाना, सागर बाबरिया, जयसिंग मकवाना, भावेश मारू, हरिश पुंगेशू आदिंची नावे आहेत.
सफाई कामगार आत्मदहनाच्या चौकशीची मागणी
By admin | Updated: May 11, 2014 22:14 IST