नाशिक : कोपर्डी येथील विद्यार्थिनीवरील अत्याचाराची घटना, तसेच अॅट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराच्या विरोधात मराठा समाजाकडून २४ सप्टेंबरला शहरातून मराठा क्रांती मूक मोर्चा शहरात काढण्यात येणार आहे. या मोर्चाचा मार्ग निश्चित झाला असून, मोर्चाच्या तयारीसाठी शहरातील विविध भागांत समाजाच्या नेत्यांकडून बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. मराठा समाजाच्या कोर कमिटीच्या माध्यमातून शहरात ठिकठिकाणी होणाऱ्या बैठकांमधून निश्चित करण्यात आलेला मोर्चाचा मार्ग समजावून सांगितला जात आहे. तपोवन परिसरातून मोर्चाला प्रारंभ होणार असून पुढे औरंगाबाद नाका, आडगाव नाका, काट्या मारु ती, निमाणी, पंचवटी कारंजा, व्हिक्टोरिया पूल, रविवार कारंजा, रेडक्र ॉस मार्गे एमजी रोडवरून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मोर्चा दाखल होणार आहे. मोर्चाच्या तयारीसाठी शहरातील विविध भागातून बैठका घेण्यात येत असून सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी या बैठकींना उपस्थिती लावत आहेत. मोर्चाचे नियोजन करताना पार्किंगची व्यवस्था आणि शहरात होणाऱ्या गर्दीचे नियोजन मोठे आव्हान असणार आहे. कोपर्डी घटनेचे संपूर्ण राज्यात मराठा समाजातून संतप्त पडसाद उमटत असून औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद आदि विविध जिल्ह्यांत झालेल्या मोर्चांमध्ये लाखोंच्या संख्येने मराठा समाज सहभागी होत आहे. स्थानिक नेत्यांकडून या सर्व मोर्चांपेक्षा नाशिकमध्ये भव्य मोर्चा काढण्यासाठी शहरातील बैठकांमध्ये तयारी सुरू असून, नाशिकच्या मोर्चात जिल्ह्यातून सुमारे पंधरा लाख मराठा बांधव-भगिनी सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. मराठा समाजावरील अन्याय, अत्याचाराच्या खोट्या तक्रारींच्या माध्यमातून अॅट्रॉसिटी कायद्याचा होणारा दुरुपयोग, रखडलेले मराठा आरक्षण, नोकऱ्यांमधील कमी होणाऱ्या संधी यामुळे मराठ्यांची कुचंबणा होत असल्याची भावना समाजाच्या बैठकींत व्यक्त होत आहे. कोपर्डीच्या घटनेने मराठा समाजातील असंतोष उफाळून बाहेर आला असल्याचा मतप्रवाह या बैठकांच्या माध्यमातून निर्माण केला जात असून, मोर्चाच्या माध्यमातून समाज आपले उत्तरदायित्व निभावेल आणि होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडेल, अशी भावना बैठकीतून व्यक्त होत आहे. याच आशयाचे संदेश सोशल मीडियातूनही फिरत आहेत. (प्रतिनिधी)
मराठा क्रांती मोर्चाचा मार्ग निश्चित
By admin | Updated: September 11, 2016 02:15 IST