लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांची अवघ्या दीड वर्षात बदली झाली असून, त्यांच्या जागी भारतीय प्रशासक सेवेतील दीपककुमार मीना यांची नाशिक जिल्हा परिषदेत बदली झाली आहे.बरोबर दीड वर्षांपूर्वी २५ नोव्हेंबर २०१५ रोजी मिलिंद शंभरकर यांची मुंबईहून नाशिक जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्या जागी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली होती. दीड वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी नियम-निकषाचा आग्रह धरीत चुकीच्या प्रथांना पायबंद घातला होता. तसेच हागणदारीमुक्त अभियानात नाशिकची भरीव कामगिरी व्हावी म्हणून ‘गुड मॉर्निंग’ पथकासोबत भल्या पहाटे उठून त्यांनी नुकतेच ‘टमरेल जप्ती’ अभियानही राबविले होते. जिल्हा परिषदेच्या काही चुकीच्या कामांना मंजुरी मिळावी म्हणून सदस्य व पदाधिकाऱ्यांचा आग्रह त्यांनी मोडून काढला होता. अंगणवाड्यांची कामे रखडण्यास जबाबदार असलेल्या कार्यकारी अभियंता मिलन कांबळे यांना नुकतेच त्यांनी सक्तीच्या रजेवर पाठविले होते, तर निविदा लिपिक अमित आडके यास निलंबनाची कारणे दाखवा नोटीसही त्यांनी बजावली होती. मिलिंद शंभरकर यांचे कुटुंब मुंबईला असल्याने त्यांना मुंबईला बदली हवी होती. मात्र आता त्यांची पुणे येथील समाजकल्याण विभागाच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. प्रशासनाने त्यांच्या बदलीला दुजोरा दिला आहे.
दीपककुमार मीना नवीन सीईओ
By admin | Updated: May 9, 2017 03:00 IST