नाशिक : आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या निकाली न निघाल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले. तसेच मागण्या मान्य न केल्यास २१ जुलैपासून राज्यात बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा दिला आहे.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने म्हटले आहे की, डॉ. खानंदे समितीच्या अहवालानुसार कार्यवाही करणे, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतनत्रुटी दूर करणे, हिवताप विभागातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे बदलांचे अधिकार सहायक संचालकांना देण्यात यावेत, महाराष्ट्र विकास श्रेणीत पदोन्नती देण्याकरिता आरोग्य पर्यवेक्षकांच्या ज्येष्ठता याद्या तयार करण्याचे निर्देश आयुक्तांना द्यावेत, बंधपत्रित आरोग्यसेवक (स्त्री/पु.) यांच्या सेवा नियमित करणे, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे व सर्व सेवासुविधा लागू करणे, गट प्रवर्तक व आशा यांना किमान वेतनानुसार १५ हजार व १० हजार रुपये देणे, औषधनिर्माण अधिकाऱ्यांना केंद्र शासनाप्रमाणे वेतनश्रेणी लागू करणे, बहुविध आरोग्यसेवक (पु.) या पदाचे ४ जून २०१३ चे सेवा नियम दुरुस्त करून क्षेत्र कार्यकर्ता यांच्या पदोन्नतीकरिता असलेल्या दहा टक्के कोटा रद्द व आरोग्यसेवक यांच्याप्रमाणे नियुक्तीपूर्वी प्रशिक्षण मिळावे यांसह विविध मागण्यांचा समावेश आहे. धरणे आंदोलनात राज्य अध्यक्ष अरुण खरमाटे, प्रमिला कुंभारे, अशोक जयसिंगपुरे, ए. एस. सपकाळे, अब्दुल युसूफखान, भटू शिंदे, राजेंद्र बैरागी, विलास शेलार, शेख हसिना, दीपक अहिरे आदि सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
प्रलंबित मागण्यांसाठी आरोग्य कर्मचारी संघटनेचे धरणे
By admin | Updated: July 15, 2014 00:47 IST