नाशिक : यंदाच्या मोसमात पावसाने अपेक्षित हजेरी न लावल्याने बळीराजाने खतांच्या खरेदीकडेही पाठ फिरविल्याचे खत विक्रीच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. खरीप हंगामासाठी १ लाख ८८ हजार ४२५ मेट्रिक टन खतांची उपलब्धता असताना प्रत्यक्षात १ लाख ५४ हजार ९६३ मेट्रिक टनच खतांची विक्री झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान, येत्या रब्बी हंगामासाठी कृषी विभागाने २ लाख ३६ हजार मेट्रिक टन खतांची मागणी केलेली असताना प्रत्यक्षात जिल्ह्यासाठी २ लाख ११०० मेट्रिक टन खत आवंटन मंजूर झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आता त्यात या खरीप हंगामातील ३३ हजार ४६३ मेट्रिक टन शिल्लक खतांची भर पडणार असल्याने रब्बीसाठी मुबलक प्रमाणात खते उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत.जिल्ह्यात खरीप हंगामासाठी युरिया खताची १ लाख २० हजार मेट्रिक खतांची मागणी नोंदविण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात ७८ हजार २५० मेट्रिक टन खतांचा पुरवठा होऊन त्यातील ७३ हजार ८३८ मेट्रिक टन खतांची विक्री झाल्याचे व त्यातील ४४१३ मेट्रिक टन खते शिल्लक आहे. १०:२६:२६ या खतांची २२ हजार ५०० मेट्रिक टन खताची मागणी नोंदविण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात २४ हजार ९०० मेट्रिक टन खतांचा पुरवठा झाला. यात अमोनियम सल्फेटचा अपवाद वगळता सर्वच खते शिल्लक राहिल्याचे दिसून येते. एकूण खरीप हंगामात १ लाख ८८ हजार ४२५ मेट्रिक टन खत पुरवठा होऊन त्यातील १ लाख ५४ हजार ९६३ मेट्रिक टन खतांची विक्री होऊन ३३ हजार ४६३ मेट्रिक टन खतसाठा शिल्लक असून, आता हा खतसाठा रब्बी हंगामासाठी उपलब्ध राहणार आहे.(प्रतिनिधी)
कमी पावसाने खतांच्या विक्रीत घट
By admin | Updated: October 8, 2015 23:31 IST