लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव नेऊर : नैसर्गिक आपत्ती आल्यास शेती पिकासाठी केलेला खर्च पीक विम्यातून भरून निघेल या आशेतून शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा काढत असतो; पण पीक विमा काढूनही त्याचा मोबदला मिळत नसेल तर पीक विमा काढायचा कशासाठी, अशी शेतकऱ्यांची धारणा झाल्याने दरवर्षी हजारो शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा काढण्याकडे पाठ फिरवत आहेत. यावर्षी शासनाने दिलेल्या मुदतीत येवला तालुक्यात फक्त ५२४१ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
सन २०१९ ला २२ हजार शेतकऱ्यांनी तर २०२० ला १४ हजार पाच शेतकऱ्यांनी आणि २०२१ ला फक्त ५२४१ शेतकऱ्यांनी विमा उतरविल्याची माहिती समोर आली आहे. दोन वर्षांपासून परतीचा पाऊस पडून पिकाचे नुकसान होत आहे. दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी काढलेल्या पीक विम्याचे पैसे सरसकट शेतकऱ्यांना मिळाले होते; पण मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांनी पिकाचा काढलेला विमा नुकसान होऊनही मात्र मंजूर न नसल्याने या वर्षी शेतकऱ्यांनी खरिपाचा पीक विमा भरण्याकडे पाठ फिरविल्याचे येवला तालुक्यातील शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. खरिपाच्या पेरणी करता शेतकरी कर्ज काढून, उसनवारीने किंवा आपले दागिने गहाण ठेवून शेतात खरिपाची पेरणी करीत असतो व उरलेल्या पैशातून पिकाचा विमा भरत असतो. त्यातच कधी काळी पिके जोमात असताना पाऊस दांडी मारतो तर कधी हातातोंडाशी आलेला घास अति पावसाने हिरावून घेतला जातो. पिकाचा काढलेल्या विमा मंजूर होईल व झालेले नुकसान भरून निघेल, अशी आशा शेतकऱ्याला असते.
इन्फो...
प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकरी संख्या
वर्ष शेतकरी संख्या
२०१९ २२०००
२०२० १४००५
२०२१ ५२४१
कोट...
मागील वर्षी चांगल्याप्रकारे पिके आल्यामुळे नुकसान कमी झाले व मोजक्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळाला. दरवर्षी पीक विमा काढला म्हणजे नुकसान भरपाई मिळतेच, अशी शेतकऱ्यांची धारणा झाल्यामुळे मागील वर्षी पिके चांगली आल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. त्यामुळे यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमाकडे पाठ फिरवली. पूर्वी कृषी कार्यालयाशी विमा केंद्र संलग्न होते; परंतु आता स्वतंत्र विमा केंद्र कार्यालय झाल्याने त्यामुळे त्वरित शेतकऱ्यांना झालेले नुकसान कळवता येणार आहे.
- कारभारी नवले, कृषी अधिकारी येवला
फोयो - २७ जळगाव नेऊर १
270821\27nsk_30_27082021_13.jpg
पिकाचे झालेले नुकसान