नाशिक : निविदाप्रक्रियेत रिंग झाल्याच्या आरोपाने वादग्रस्त ठरलेल्या स्वच्छतेच्या ठेक्याला स्थायी समितीने अखेर सिंहस्थांतर्गत अत्यावश्यक बाब म्हणून काही अटी-शर्तींवर मंजुरी देण्याचा निर्णय घेतला. साफसफाईच्या कामांसाठी बाल्मीकी-मेहतर व मेघवाळ समाजातील लोकांसह स्थानिक कामगारांना प्राधान्य देण्याची अट घालतानाच प्रस्तावांतील काही त्रुटी दुरुस्त करण्याचेही आदेश सभापती शिवाजी चुंभळे यांनी दिले. दरम्यान, सदरचा ठेका रद्द करत महापालिकेनेच मानधनावर नोकरभरती करावी, अशी आग्रही भूमिका सदस्यांनी घेतली. सिंहस्थ कुंभमेळ्यात पर्वकाळातील तीन महिन्यांसाठी साधुग्रामसह रामकुंड, गोदाघाट परिसर आणि भाविक मार्गांसाठी साफसफाईकरिता प्रशासनाने सुमारे पावणे पाच कोटी रुपयांचा प्रस्ताव सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवला होता, परंतु स्वच्छताविषयक ठेक्याबाबत संशयाचे ढग गडद झाल्याने आणि त्यातच स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या भूमिकेमुळे स्थायी समितीने सदरचा प्रस्ताव तहकूब ठेवत त्यावर मंगळवारी पुन्हा बैठक बोलाविली होती.
अटी-शर्तींवर मंजुरी देण्याचा निर्णय
By admin | Updated: July 1, 2015 02:18 IST