नाशिक : महापालिकेच्या कामकाजात नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी केंद्र शासनाने नगरराज बिल तयार केले असून, त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक होते; परंतु गेल्या पाच वर्षांत कोणत्याच प्रभागात नगरसेवकांनी अशा प्रकारची क्षेत्र सभा घेतली नसल्याने त्यांना अपात्र ठरवावे, अशी मागणी संविधानप्रेमी संघटनेने केली आहे. यासंदर्भात संस्थेच्या वतीने आयुक्त कैलास जाधव यांची भेटदेखील घेण्यात येणार आहे. नाशिक महापालिकेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्याचवेळी कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या नगरसेवकांना अपात्र ठरावावे, अशी मागणी लोकनिर्णय संस्थेचे संतोष जाधव यांनी केली आहे. टिळक वाचनालयात यासंदर्भात कार्यक्रम झाला. नगरराज बिलाची मांडणी यावेळी करण्यात आली. केंद्र शासनाने नेहरू नागरी अभियान राबवले. त्यावेळी अशा प्रकारचे बिल राबवण्याचे आदेश देण्यात आले होत. राज्य सरकारने २००८ मध्ये नगररचना बिल तयार केले. त्यानुसार सर्व महापालिकांतील नगरसेवकांना क्षेत्र सभा घेणे बंधनकारक आहे; परंतु प्रत्यक्षात मात्र अशी सभा घेतली गेलेली नाही. राज्य शासनाच्या आदेशाचे हे उल्लंघन आहेच; परंतु त्याचबरोबर नागरिकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात आले आहे, त्यामुळे सर्व १२२ नगरसेवकांना अपात्र ठरवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली, तसेच संविधानप्रेमींनीच क्षेत्र सभा घ्यावी, असा संकल्पदेखील करण्यात आला.
यावेळी कॉ. राजू देसले, किरण मोहिते यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.