नाशिकरोड : आर्टिलरी सेंटर रोडवरील रस्ता दुभाजकावरून उतरणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्याचा तोल गेल्याने मंगळवारी संध्याकाळी तो ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली सापडून गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तो मृत झाला. अपघाताच्या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी ट्रकवर दगडफेक करून काचा फोडल्या. तास-दीड तास वाद सुरू राहिल्याने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण होते. संतप्त जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली.दत्तमंदिर रोड मनपा शाळा क्रमांक १२५मध्ये सहावीच्या वर्गात शिकत असलेला अनिकेत अनिल सानप (वय ११, रा. भारती मठ, सुभाषरोड) हा आपल्या मित्रासोबत मंगळवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर घरी परतत होता. आर्टिलरी सेंटररोड येथे नव्याने बनविण्यात येत असलेल्या सीमेंटच्या रस्ता दुभाजकावरून अनिकेत व त्याचा मित्र अनुराधा टॉकीजच्या दिशेने जात होते. विजयालक्ष्मी चेंबर जानकी हॉस्पिटलजवळ अनिकेत हा दुभाजकावरून उतरत असताना त्याचा तोल गेला. त्याचवेळी अनुराधा टॉकीजच्या दिशेने माती-मुरूम (रॅबीट) घेऊन जाणारा ट्रक (एमएच १८ एम ४७६७)च्या पाठीमागील चाकाखाली अनिकेत सापडून गंभीर जखमी झाला. ट्रकचालक काही अंतरावर ट्रक थांबवून पळून गेला. परिसरातील रहिवासी व कार्यकर्त्यांनी जखमी अनिकेतला त्वरित बिटको रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. जखमी अनिकेतच्या मित्राने त्याचे नाव, पत्ता सांगितला.
ट्रकच्या चाकाखाली सापडून मृत
By admin | Updated: March 4, 2015 01:34 IST