संगमेश्वर : मालेगाव महानगरपालिकेचा प्रभाग ४ हा २०१२ मध्ये हद्दवाढीत सायने बुद्रूक व दरेगाव या गावांचा या प्रभागात समावेश झाला. या गावासह शहराच्या जाफरनगरपर्यंत समावेश यात होतो. हिंदू-मुस्लीम मिश्र मतदार यात समाविष्ट आहेत. गेली दोन पंचवार्षिक या प्रभागाने इंदिरा कॉंग्रेस पक्षाला भरभरून प्रतिसाद देत चारही नगरसेवक विजयी केले आहेत. कॉंग्रेस पक्षाचे माजी आमदार रशीद शेख यांचा मोठा प्रभाव या प्रभागात दिसून येतो.
ग्रामपंचायत राजकारणातील मोठा अनुभव असणारे धर्मा भामरे यांच्या पत्नी मंगला धर्मा भामरे, सायने बुद्रूकचे भूमिपुत्र व तरुण कार्यकर्ते नंदकुमार वाल्मीक सावंत तसेच अब्दुल अजीज अब्दुल सत्तार, रजिया बेगम अब्दुल माजिद हे इंदिरा कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार २०१७ च्या निवडणुकीत निवडून आले आहेत. एकाच प्रभागात एकाच पक्षाचे उमेदवार निवडून येऊन एक वेगळा इतिहास या प्रभागाने निर्माण केला आहे. त्यातच महापालिकेवरही कॉंग्रेस पक्षाचाच महापौर झाल्याने या नगरपित्यांना काम करणे खूपच सोपे झाले. नंदकुमार सावंत यांना स्थायी समितीचे सदस्य पद मिळाले, तर अब्दुल अजीज अब्दुल सत्तार यांना प्रभाग सभापती पदाची संधी मिळाली. मंगला भामरे सलग दुसऱ्यांदा या प्रभागातून निवडून आल्या आहेत हे विशेष.
प्रभाग ४ मध्ये प्रत्येक नगरसेवकाने सुमारे तीन कोटी निधीची विकासकामे केली आहेत. असे एकूण १२ कोटी रुपयांची विकासकामे झाल्याचा दावा या नगरपित्यांनी केला आहे. अण्णा भाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत या प्रभागात विविध विकास कामांसाठी सुमारे सव्वा कोटी रुपयांचा निधी आणण्यात नंदकुमार सावंत यांना यश मिळाले आहे. ही सर्व कामे आता प्रगतिपथावर आहेत. प्रभाग ४ हा अविकसित भागात रस्ते, गटारी, सिमेंट रस्ते, पथदीप, प्रवेशद्वार कमान सुशोभिकरण, मोरी बांधणे, नाला बनविणे आदींसह मूलभूत सुविधाची विकास कामे केल्याचा दावा या नगरसेवकांनी केला आहे.
इन्फो
नवीन भागाकडे लक्ष
गेले दोन पंचवर्षिक सलगपणे एकाच पक्षाचे उमेदवार निवडून येण्याचा या प्रभागाने जणू विक्रमच केल्याने त्यांच्या विजयाचा वारू रोखण्याचे कडवे आव्हान विरोधकांसमोर असणार आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या हिंदू बहुल भागातून शिवसेना व भाजपसाठी हे एक आव्हान असणार आहे, तर जाफरनगरसारखा मुस्लीम बहुल भागात जनता दल व राष्ट्रवादी कॉंग्रेस, एमआयएम कितपत टिकाव धरेल हा येणारा काळच ठरवेल.
पक्षीय बलाबल :
इंदिरा कॉंग्रेस - ४
जनता दल - ०
शिवसेना - ०
भाजप - ०
एमआयएम - ०
फोटो फाईल नेम : १२ एमएसईपी ०१ - अब्दूल अजीज अब्दूल सत्तार
फोटो फाईल नेम : १२ एमएसईपी ०२ - नंदकुमार सावंत
फोटो फाईल नेम : १२ एमएसईपी ०३ - मंगला भामरे
फोटो फाईल नेम : १२ एमएसईपी ०४ - रजीयाबेगम अब्दुल मजीद