विंचूर : येथे रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत डिजे वाद्यावर गाणे वाजविण्याच्या कारणावरून पंचायत समिती सदस्य आणि येथील सरपंच यांच्या गटात जबर हाणामारी होऊन चारजण गंभीर जखमी झाले. दोन्ही गटांनी परस्पराविरोधी तक्रार दिली असून, लासलगाव पोलीस ठाण्यÞात पंचवीस ते तीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता २० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. शुक्र वारी रामनवमीनिमित्त येथे प्रथमच मिरवणूक काढण्यात आली. रात्री साडे नऊच्या दरम्यान लासलगाव रस्त्यावरील वेशीजवळ मिरवणूक येताच डीजेवरील गाण्यावरु न दोन गटात शाब्दिक चकमक उडाली. त्याचे पर्यावसान जबर हाणामारीत झाले. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरिक्षक सानप यांनी तत्काळ विंचूर येथे धाव घेतली. पंचायत समिती सदस्य राजाराम दरेकर व ग्रामपालिका सरपंच शकुंतला दरेकर या दोन्ही गटांविरुध्द जमावबंदीचे उल्लंघन केल्याने दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. योगेश राजाराम दरेकर यांनी दिलेल्या फिर्यादित १९ जणांची नावे दिली आहे. तसेच विलास रत्नाकर दरेकर यांनी आपल्या फिर्यादित पंधरा ते वीस जणांची नावे दिली आहेत. यामध्ये राजाराम दरेकर व त्यांची मुलगी यांना जबर दुखापत झाली. तसेच सचिन दरेकर व त्यांच्या मातोश्री सरपंच शकुंतला दरेकर यांनाही दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.जमावाला नियंत्रीत करताना पोलिसांची दमछाक झाली. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी दीपक गिऱ्हे. सहायक पोलिस निरीक्षक सानप, यांसह निफाड येथील पोलिसांना पाचारण करण्यात आले. कायदा सर्वांसाठी सारखाच असून यापुढे कोणाचीही गय केली जाणार नसून गावात शांतता राखावी, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक गिऱ्हे यांनी केले आहे.
डिजेच्या गाण्यावरून दोन गटात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2016 23:57 IST