वणी : सप्तशृंगगडावरील उतरणीच्या पायऱ्यांवर सुमारे सात फूट लांबीचा दगड कोसळली. सुदैवाने हा मार्ग बंद असल्याने दुर्घटना टळली असली तरी, निधीअभावी माउण्टन बॅरिकेडिंगचे काम रखडल्याने भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.अर्धपीठ असणाऱ्या सप्तशृंग-गडावर सोमवारी उतरणीच्या पायऱ्यांवर ७ फूट लांबीचा दगड कोसळला. येथे दगड व दरड कोसळण्याच्या घटना नव्या नाहीत. भाविक, मंदिर परिसराचा अशा दुर्घटनेपासून बचाव करण्यासाठी जिओसिन्थेकट तंत्रज्ञानाचा वापर करून २३ कोटी ५० लाख रुपयांचे काम मेका फेरी कंपनीला देण्यात आले होते. २०१३ साली हे काम सुरू करण्यात आले. ५० वर्ष टिकणारे ३० ते ६० मीटर उंचीपर्यंत डोंगराच्या चारही बाजूस संरक्षक जाळ्या लावण्याचे नियोजन आखण्यात आले होते. डोंगराला ड्रिलिंग करून चार मीटर अंतरावर लोखंडी गर्डर लावून संरक्षक जाळ्या लावण्याचे काम सुरू करण्यात आले यासाठी परदेशी तंत्रज्ञ व हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली; मात्र अडीच वर्षाचा कालावधी उलटून केवळ ५० टक्केच काम झाले. याबाबत न्यासाचे सहाय्यक व्यवस्थापक भगवान नेरकर यांनी, सदरचे काम निधीअभावी रखडले असून, बांधकाम विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणा-खाली माउण्टन फ्लेक्सिबल बॅरिअरचे काम मिका फेरी इन्व्हायरमेंट कंपनीने केले; मात्र बांधकाम खात्याकडून उर्वरित कामासाठी किमान २५ कोटी रक्कम उपलब्ध करून दिल्यास संपूर्ण काम पूर्ण होऊ शकेल. आॅक्टोबर महिन्यात नवरात्रोत्सव सुरू होत असून, लाखो भाविकांची उपस्थिती या काळात असते. भविष्यातील भाविकांची सुरक्षितता लक्षात घेता सदरचे काम लवकर पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)
भाविकांची सुरक्षितता धोक्यात
By admin | Updated: July 13, 2016 23:09 IST