पेठ : तालुक्यातील वनविकास महामंडळाच्या आंबे व झरी या वनपरिक्षेत्रातील जंगलास आग लागल्याची घटना घडली. या दोन्ही परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांसह जिल्हा पातळीवरील अधिकारी पेठ येथील वखारीमध्ये लिलावात मश्गुल असल्याने ही आग लावली की लागली, असा सवाल उपस्थित होत आहे. वनविकास महामंडळाच्या पंचनाम्यात अवघे दीड हेक्टरवरील वनसंपदेचे नुकसान झाल्याचे दर्शविण्यात आले आहे.पेठ तालुका अतिदुर्गम डोंगर-दऱ्यांचा, सातपुडा पर्वतराजीतील भूप्रदेश. एकेकाळी येथे वनसंपदा भरभरून होती. आज त्यातील १० टक्केसुध्दा जंगल शिल्लक राहिले नाही. त्यातच सन १९८० च्या दशकात राज्य शासनाने वनविकास महामंडळाची स्थापना करून वनसंपदेचे संरक्षण व संवर्धन करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले. मात्र वनसंपदेचे ना संरक्षण झाले ना संवर्धन. आजपर्यंत हजारो हेक्टरवरील वनसंपदेची चोरडी वृक्षतोड झाली व होत आहे. काही महामंडळाने केली. महामंडळाच्या या भूमिकेमुळे हे चोरटे आजपर्यंत हाती लागले नसून मौल्यवान सागवानी लाकूड मात्र सापडले तेही बेवारस. त्याचा लिलाव तेवढा महामंडळाने धूमधडाक्यात करून पैसा कमावला; पण चोरटी तोड करणारे कोण, याचा शोध घेण्याचा प्रयत्न कुठल्याही अधिकाऱ्याने केला नाही, अशी परिसरात चर्चा आहे. अशी परिस्थिती असताना सोमवारी मध्यरात्री आंबे वनपरिक्षेत्रातील शेपुझरी येथे लागलेली आग झरी वनपरिक्षेत्रातील नवापाड्यापर्यंत डोंगरमाथ्यावरील आग डोंगराच्या पायथ्यापर्यंत येऊन पोहचली. आग लागल्याची माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी माहिती होते तरी याकडे त्यांनी दुर्लक्ष करून पेठ येथील लिलावात लक्ष दिले. यामुळे वनसंपदेचे नुकसान झाले. मात्र जिल्हा कार्यालयास अवघे दीड हेक्टरवरील वनसंपदेचे नुकसान झाले असल्याची माहिती देण्यात आल्याने याबाबत उलटसुलट चर्चा रंगू लागली आहे. (वार्ताहर )
आंबे झरीतील जंगलात आग लागल्याने नुकसान
By admin | Updated: April 2, 2016 23:42 IST