घोटी : इगतपुरी तालुक्यात लागवड केलेल्या भात पिकाच्या बियाणात मोठ्या प्रमाणात भेसळ झाल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. याबाबत भात बियाणे निर्मिती करणारे संबंधित कारखाना प्रशासन जबाबदारी झटकत असल्याने भेसळ निष्पन्न झालेल्या संबंधित कंपनीचा परवाना रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतल्याने जिल्हा कृषी विभाग जागा झाला असून, याबाबत तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी मनसे पदाधिकारी, शेतकरी, कृषी अधिकारी यांची बैठक पार पडली.गत खरीप हंगामात भात पिकाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना भात बियाणात भेसळ निघाल्याने नुकसान झाले होते. याबाबत व्यथित झालेल्या शेतकऱ्यांनी आपली व्यथा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप किर्वे व तालुकाध्यक्ष मूलचंद भगत यांच्याकडे मांडल्यानंतर मनसेने पुढाकार घेतला होता. या बैठकीत जिल्हा कृषी अधिकारी हेमंत काळे यांनी चौकशी करून कारवाई करण्याची ग्वाही शेतकऱ्यांना दिली आहे. या बैठकीस मनसे उपजिल्हाध्यक्ष संदीप किर्वे, जिल्हा सरचिटणीस रतनकुमार इचम, तालुकाप्रमुख मूलचंद भगत, भोलेनाथ चव्हाण, गणेश उगले, प्रताप जाखेरे, पिंटू चव्हाण, विजय भोर, अंकुश गतीर, जनार्दन गतीर, मच्छिंद्र भटाटे, प्रदीप कडवे, विनोद दळवी, विनायक किर्वे, नामदेव हडके, श्रीपाद तांगडे, शैलेश गतीर आदि शेतकरी बांधव उपस्थित होते. (वार्ताहर)
बियाणात भेसळ असल्याने नुकसान
By admin | Updated: October 23, 2016 23:08 IST