तळेगाव रोही : परिसरात दुष्काळी परिस्थिती असून, चाऱ्या व पाण्याअभावी पशुधनाबरोबर दुग्धव्यवसायही धोक्यात आला आहे. १८ सप्टेंबरला सर्वत्र पावसाने हजेरी लावली असली तरी तळेगाव रोही, साळसाणे, विटावे, काळखोडे, वाहेगाव साळ, वाकी खुर्द, वाकी बुद्रुक आदि परिसरात स्प्रे (स्प्रिकंर) मारावा एवढाच पाऊस झाला. वरुणराजाने परिसरातील गावांवर अवकृपा का केली, असा संभ्रम गावकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. पावसाअभावी परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पशुधन धोक्यात आले असून, पशुपालक चिंताक्रांत झाला आहे. तळेगाव रोहीमध्ये एकूण पाच दूध संकलन केंद्र होते; त्यातील एक बंद पडले. परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर सर्वच दूध केंद्रे बंद पडतील असे चित्र दिसत आहे. चाऱ्याचा प्रश्न भेडसावत असल्याने शेतकऱ्यांकडून आपली दूध देणारी जनावरे, बैल डोंगरात सोडून दिली जात आहेत, तर काही शेतकरी कवडीमोल किमतीत जनावरांचा सौदा करत आहेत. आता परिसरावर वरुणराजाने कृपा केली तर शेतजमीन कसण्यासाठी बैल कसे मिळणार, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. यापूर्वी गायरान, गावठाण मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. परंतु आता खूपच कमी झाले आहे. तसेच काळखोडे, तळेगाव रोही, समिट स्टेशनजवळील शेतकरी रेल्वेलाइनच्या जवळील रेल्वे पटरीचे पोल दोनशे ते तीनशे रुपयात गवत चरावयास घेत आहेत. परंतु आता गवतच मिळेनासे झाल्याने पशुधन कसे जगवायचे, असा प्रश्न पशुपालकांना पडला आहे. मनोहर वाकचौरे, साहेबराव ठाकरे, सुभाष ठाकरे, पुंजाराम भोकनळ, शरद कदम हे पाच दूध संकलनाचे काम करतात. त्यात दुष्काळामुळे शरद कदम यांचे दूध संकलन बंद झाले आहे. सर्व मिळून ४ ते ५ हजार लिटर दूध संकलन करत असत; परंतु आता रोज फक्त एक हजार लिटर दुधाचे संकलन होत आहे. शेतकऱ्यांना फक्त २० ते २१ रुपये दराने दुधाचे भाव मिळतात. त्यातही डिग्री, फॅट याप्रमाणेच भाव दिला जातो. त्यातून चारा, ढेप, उस, बांडी यांचा खर्चदेखील वसूल होत नसल्याने बळीराजा व पशुपालक अडचणीत आला आहे. (वार्ताहर)
तळेगाव रोही परिसरात दुग्धव्यवसाय संकटात
By admin | Updated: September 23, 2015 23:28 IST