नरेंद्र दंडगव्हाळ सिडकोमहापालिका विद्युत विभागाच्या वतीने सिडको भागात विजेची बचत व्हावी, यासाठी काही भागांत टी-५ दिवे लावले आहेत. परंतु हे दिवे कायमच चालू-बंद होत असल्याने एकीकडे मनपाकडून बचत केली जात असल्याचे सांगितले जात असले तरी दुसरीकडे मात्र या दिव्यांच्या दुरुस्तीसाठीच अधिक खर्च होत असल्याने सध्या मनपाच्या विद्युत विभागाचे सुरू असलेले कामकाम म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर असेच म्हणण्याची वेळ आली आहे.महापालिकेच्या सिडको विद्युत विभागाच्या वतीने प्रभाग २४, २५, २७, २८, २९ व ३१ आदि सहा प्रभागांचे कामकाम केले जात आहे. या सहा प्रभागात मिळून सुमारे १९ हजार पथदीप बसविण्यात आले आहेत. यात आजमितीला टी-५ (नळकांड्यांची फिटिंग असलेले) तीन ते चार हजाराच्या आसपास आहे. याव्यतिरिक्त १९ हजारांपैकी सुमारे १५ हजार पथदीप हे सोडियमचे दिवे असून अत्यंत कमी प्रमाणात एलईडी बसविण्यात आले आहेत. एकूणच मनपाचे वीज बचत करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी सोडियम दिवे व टी-५ फिटिंगच्या देखभाल, दुरुस्तीमुळे खर्चात व परिणामी वीज बचत होत नसल्याचे दिसून येत आहे. टी-५ फिटिंग लावण्यामागे मनपाचा वीज बचतीचा उद्देश होता, परंतु या फिटिंगमध्ये मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करावी लागत असल्याने वीज बचत होणे तर दूरच, परंतु यावरील खर्च वारंवार करावा लागत आहे, तसेच दुरुस्ती करण्यासाठीचे साहित्यही अनेकदा उपलब्ध होत नसल्याने रोगापेक्षा इलाजच भयंकर अशी मनपाची स्थिती झाल्याचे दिसून येत आहे.
रोगापेक्षा इलाज भयंकर
By admin | Updated: April 4, 2017 02:07 IST