किरण अग्रवाल ल्ल नाशिक गोल्फ क्लब ग्राउण्डच्या नावाने परिचित हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान... या मैदानाने आजवर अनेक मान्यवरांच्या सभा पाहिल्या. त्यासाठी हजारोंची गर्दी अंगावर घेतली. त्या मैदानाचीच आज जणू परीक्षा आहे. कारण, यात प्रथमच मावू न शकणाऱ्या गर्दीचे साक्षीदार होण्याचे भाग्य या मैदानाला आज लाभणार आहे. त्यासाठी निमित्त आहे ते मराठा क्रांती मोर्चाचे. गर्दी, शिस्तबद्धता व कुणाही एका व्यक्ती अगर राजकीय पक्ष- संघटनेचे नेतृत्व नसणारे ठिकठिकाणचे मराठा क्रांती मोर्चे सर्वांसाठीच उत्सुकता व आश्चर्याचेच विषय ठरले आहेत. याच संदर्भाने नाशिककरांचीही ताणली गेलेली उत्कं ठा आज शमणार आहे. गेल्या काही दिवसांपासून यासाठी सुरू असलेल्या नियोजनाची पूर्तता आज होऊ घातली आहे. तपोवनातून सुरू होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाचा समारोप कान्हेरे मैदानावर होणार आहे. नाशकात यापूर्वी १९९५मधे शिवसेनेचे जे चौथे अधिवेशन पंचवटीतील आर.पी. विद्यालयाच्या प्रांगणात झाले होते, तेव्हा रस्त्यांवर शिवसैनिकांची अलोट गर्दी वाहिल्याचे दिसले होते. ती राजकारण प्रेरित गर्दी होती. दर बारा वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्यातील शाही पर्वण्यांच्या दिवशीही मोठी गर्दी होते. ती भाविकांची, श्रद्धाळूंची असते. परंतु सामाजिक जाणिवेतून व मनामनात खदखदणारा असंतोष घेऊनही ‘मूक’पणे त्याचे दर्शन घडविणारी आजपर्यंतच्या गर्दीपेक्षाही मोठी गर्दी आज बघावयास मिळणार आहे. ती समाजाच्या एकसंधतेचा आविष्कार घडविणारी असेल. राजकारण असो की समाजकारण, त्यातील यशापयश अगर चढउतार हे तसे पचवण्यासारखे असतात. परंतु जेव्हा सामाजिक अस्मितांनाच धक्का लागू पहातो किंवा उपेक्षेचा दबलेला हुंकार आक्रोश बनून उसळू पाहतो तेव्हा नेतृत्वाच्याही भिंती मोडून पडतात. एकीच्या सामूहिक बळाचा साक्षात्कार अशावेळी घडून येतो. मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने नाशकातील गर्दीचे इतिहासातील सारे विक्रम आज मोडले जाणार आहेत तेही त्यामुळेच. या विराट मराठा महासागराच्या पूर्वतयारीसाठी सामूहिक स्तरावर जे जे परिश्रम घेतले गेल्याचे दिसून आले त्याची फलश्रुती आज गर्दीचा विक्रम मोडण्यात घडून आल्याशिवाय राहणार नाही. कान्हेरे मैदानानेही भविष्यात या गर्दीचा अभिमान मिरवावा अशीच ती असेन. पण तसे असताना ही गर्दी, गर्दी राहणार नसून राजकारण व समाजकारणालाही वेगळी दिशा देणारी लाट ठरेल याबद्दल शंका बाळगण्याचे कारण नाही. वेगवेगळ्या ठिकाणी, विविध राजकीय पक्षात, सहकारी संस्थांत तसेच सेवा क्षेत्रात असलेल्या मराठा बांधवांनी यासाठी सारे पक्षभेद व स्पर्धा विसरून परिश्रम घेतले आहेत. ज्येष्ठ, श्रेष्ठ वा कनिष्ठतेची कसलीही चर्चा न करता, कुणाच्या निरोपाची वा कुणाकडून मनधरणीची वाट न बघता प्रत्येकजण आपापल्या पातळीवर स्वयंस्फूर्तीने मोर्चाच्या यशस्वीतेसाठी कामाला लागलेला दिसून येत आहे. असे घडण्याची अपेक्षाच कुणी केली नसेल; पण ते घडले आहे. पुन्हा हे घडताना यापैकी कुणीही आपल्या नावाची, म्हणजे प्रसिद्धीची हौस ठेवली नाही. उलट आपले नाव देऊ नका, असेच आवर्जून सांगितले जात आहे. त्यातून जाणारा सकारात्मक संदेश महत्त्वाचा आहे. शिवाय, महिला-भगिनींसह तरुणवर्गाने मोठ्या प्रमाणात यासाठी पुढाकार घेतला. आजवर जे सोसले, त्याबद्दल बोलायची संधीही न मिळाल्याचा रोष व त्वेष त्यामागे आहे हे खरे; परंतु महिला व युवकांची सक्रियता तसेच सामाजिक दायित्वाबद्दलची सजगता या निमित्ताने पुढे आली असून, त्याचाच प्रत्यय नाशकातील आजच्या क्रांती मोर्चात येऊ घातला आहे.निर्णायक वज्रमूठ एक मराठा, लाख मराठा, अशी सार्थ ओळख व महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान असलेला मराठा समाज एका कोपर्डीतील दुर्दैवी घटनेने एकवटला असला, तरी त्यामागे वर्षानुवर्षांपासूनच्या उपेक्षेचीही अनेक कारणे आहेत. शेतजमिनींचे पडलेले तुकडे, उद्योग-नोकऱ्यांमधील पिछाडी व राजकारणात घडून येत असलेले ध्रुवीकरण यासारख्या अनेक मुद्द्यांमुळे मराठा समाजातील बहुसंख्य वर्गाला उपेक्षा व अडचणींना सामोरे जावे लागते आहे. तरुणवर्गाची अवस्था तर ‘सहनही होईना व सांगताही येईना’, अशी झाली आहे. ठिकठिकाणी लाखो-लाखोंचे मोर्चे त्यामुळेच निघत आहेत. नाशिक जिल्ह्यातही मराठा समाज मोठ्या संख्येत व प्रभावशाली आहे; पण तो तितकाच मोठ्या प्रमाणात विखुरलेला आहे. या मोर्चाच्या निमित्ताने तो एकवटला असून, आगामी काळात ही एकसंधतेची वज्रमूठच निर्णायक ठरणार आहे.
गर्दीचा उच्चांक आज मोडणार
By admin | Updated: September 24, 2016 01:50 IST