पंचवटी परिसराला विशेष धार्मिक महत्त्व असल्याने दैनंदिन हजारो भाविक नाशिकला पंचवटीत आल्यानंतर परिसरातील अनेक देवदेवतांच्या मंदिरात दर्शनासाठी जायचे. मात्र गेल्या वर्षी मार्च महिन्यात देशात कोरोना संसर्ग सुरू झाल्याने त्याचा सर्वच व्यवस्थेवर मोठा परिणाम जाणवला होता. गर्दीच्या ठिकाणी विषाणूंचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने वेळीच खबरदारी म्हणून देवदेवतांच्या मंदिरातदेखील निर्बंध लावून मंदिरे बंद केले होते. काही महिन्यांपूर्वी पुनश्च हरिओम म्हणत ठप्प पडलेल्या व्यवस्था मिशन बिगेन अगेन अंतर्गत सुरू करण्यात आल्याने मंदिर, प्रवासी वाहतूक सुरू झाले आहे.
पंचवटीतील काळाराम मंदिर, सीतागुंफा, तपोवन, भक्तिधाम या परिसराला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त असल्याने परजिल्हा व परराज्यासह देश-विदेशातून भाविक मोठ्या संख्येने दैनंदिन देवदर्शनासाठी येऊ लागल्याने भाविकांची पंचवटीत देवदर्शनासाठी वर्दळ वाढली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ओस पडलेले मंदिर परिसरातील रस्ते भाविकांच्या वर्दळीमुळे काही प्रमाणात फुलत असल्याचे चित्र दिसून येत आहे.