१५ ऑगस्टला श्रीगणेशा झाला असून २४ दिवस उलटूनही येवला तालुक्यात अवघी दहा टक्के पीक नोंदणी झाल्याने लवकरात लवकर ई-पीक नोंदणी करून घेण्याचे आव्हान तहसीलदार प्रमोद हिले यांनी केले आहे.
या पाहणीची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत असल्याचे महसूल प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे सातबारा उताऱ्यावर ऑनलाइन पद्धतीने खरीप हंगामातील पिकांच्या नोंदणीला अवघे सहा दिवस उरले आहेत. तहसीलदार, महसूल विभागाचे अधिकारी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन, जनजागृती करत आहेत.
येवला तालुक्यात ६९ हजार ३०० च्या आसपास शेतकरी खातेदार आहेत. ई-पीक पाहणी ॲपवर नोंदणी सुरू होऊन बरेच दिवस झालेले असतानाही शेतकऱ्यांनी या योजनेला अपेक्षित प्रतिसाद दिलेला दिसत नाही. येवला तालुक्यात अवघ्या दहा टक्के शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणी केली असून तालुक्यात ९० टक्के शेतकरी खातेदारांची नोंदणी बाकी आहे. येवल्याचे तहसीलदार प्रमोद हिले, जळगाव नेऊर मंडळ अधिकारी मोठे, तलाठी सुलाने, पांडुरंग बोडके, निर्मळ, पूजा दिंडोरकर यांनी पुरणगाव, पिंपळगाव लेप, देशमाने, परिसरातील शेतकऱ्यांना ई-पीक नोंदणीबाबत मार्गदर्शन केले.
कोट...
खातेदार शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड करून पीक नोंदणी लवकरात लवकर करून घ्यावी, जेणेकरून यातून कोणी सुटणार नाही. एका मोबाइलवर वीस शेतकरी खातेदारांना ई-पीक नोंदणी करता येणार आहे.
- प्रमोद हिले, तहसीलदार, येवला.