लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अवघ्या दहा दिवसांपूर्वी विवाहवेदीवर चढलेल्या नवविवाहितेच्या सासूला ओटी भरण्याची साडी न आवडल्याने तसेच सासरच्यांनी जादा हुंड्याची मागणी केल्याने झालेल्या मानापमान नाट्यामुळे वराकडील मंडळी विवाहितेला लग्नमंडपातच सोडून गेल्याची घटना घडली होती़ याप्रकरणी विवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आडगाव पोलीस ठाण्यात मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथील वरासह सासरच्या दहा जणांविरोधात फसवणूक, हुंडाबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पांडुरंग आहेर (रा़ फ्लॅट नंबर ११, रजनीसुधा अपार्टमेंट, आरटीओ कॉलनी, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी तन्वी (निकिता) हिचा विवाह ३१ मे २०१७ रोजी मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथील धीरज नागेश अहिरे सोबत औरंगाबाद महामार्गावरील गोदावरी लॉन्समध्ये झाला़ सासरकडील मंडळींनी केलेल्या मागणीनुसार दोन लाख रुपये हुंडा व दोन तोळे सोनेही आहेर यांनी २३ एप्रिल रोजी दिले़ यानंतर साखरपुडा व विवाह चांगल्या कार्यालयात करण्याची मागणी केली व त्यासाठी १२ लाख रुपये खर्च आला़विवाह लागल्यानंतर मुलीच्या सासू पुष्पा हिने ओटीभरणाची साडी आवडली नाही म्हणून साडी फेकून देत भांडण सुरू करून मुलीला घेऊन जाणार नाही अशी धमकी देत जादा हुंड्याची मागणी केली़ वधूपिता पांडुरंग व त्यांच्या पत्नीने मुलीला घेऊन जाण्याची विनंती केली़; मात्र वराकडील मंडळींनी विनंती धुडकावल्याने प्रकृती बिघडल्याने वधूपिता व माता यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले़ यानंतर त्याच रात्री आडगाव पोलीस ठाण्यात ते फिर्याद देण्यासाठी गेले असता पोलिसांनी फिर्याद न घेता वराकडील मंडळींना पहाटे साडेतीन वाजता पोलीस संरक्षणातून काढून दिले़
वधूला लग्नमंडपातच सोडणाऱ्यांविरुद्ध गुन्हा
By admin | Updated: June 11, 2017 00:16 IST