नाशिक : धोंडेगाव पीएचसीमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व ‘आशा’ आरोग्यसेविकांची गिरणारे ग्रामीण रुग्णालयामध्ये बैठक सुरू होती. दरम्यान, जेवणाच्या सुटीत रुग्णवाहिकेचा चालक संशयित सुरेश जाधव (३५, रा. सुरगाणा तालुका) याने दोन आशा आरोग्यसेविकांचा विनयभंग केल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, संशयित जाधव हा मागील काही दिवसांपासून आशा सेविकांपैकीच एक तरुणीला त्रास देत होता. मोबाइलवर अश्लील संदेश पाठविणे, संवाद साधणे आणि भेटण्यासाठी आग्रह धरत होता. त्रस्त तरुणीने आज दुपारी काही आशा सेविकांसमवेत जाऊन त्यास त्रास देणे बंद करण्यास सांगितले. यावेळी जाधव याने माफी मागितली; मात्र काही वेळेने पुन्हा ग्रामीण रुग्णालयात येऊन धिंगाणा घालत त्रस्त युवतीच्या अंगावर धाव घेतली. यावेळी युवतीस मारहाण करत असलेल्या जाधवला रोखण्यासाठी दुसऱ्या आशा सेविका पुढे गेल्या. त्यांनाही धक्काबुक्की करत साडी फाडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यामध्ये संध्याकाळी पीडित आशा सेविकांनी जाधवविरोधात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी फरार संशयित जाधवचा पोलीस शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)
विनयभंग प्रकरणी रुग्णवाहिका चालकावर गुन्हा
By admin | Updated: July 26, 2016 00:59 IST