नाशिक : दरोड्याच्या तयारीत असलेल्या पंचवटीतील दोन सराईत गुन्हेगार गणेश बाळासाहेब चांगले (३१, रा. श्रीरंग अपार्टमेंट, हनुमानवाडी), देवीदास झिपा बागुल (३१, सिद्धिविनायक अपार्टमेंट, दत्त चौक, गंगापूर) यांना सरकारवाडा पोलिसांनी अटक केली असून त्यांचे तीन साथीदार फरार झाले आहेत़ या दोघांकडून एक गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसे, स्विफ्ट कार व दरोड्याचे साहित्य असा सव्वाचार लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला असून या दोघांना न्यायालयाने ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ सरकारवाडा पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांना पंचवटीतील सराईत गुन्हेगार गंगापूर नाक्यावरील पाटील प्लाझा परिसरात दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार पोलिसांनी गंगापूर नाक्यावर सापळा लावला असता मंगळवारी (दि़ २८) मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास एक संशयास्पद स्विफ्ट डिझायर कारमध्ये (एमएच १५ सीटी ५४७२) पाच संशयित बसल्याचे दिसून आले़ पोलिसांनी ही कार थांबविली असता यातील तिघे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले, तर उर्वरित गणेश चांगले व देवीदास बागूल यांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले़ या दोघांची झडती घेतली असता चांगलेच्या कमरेला दहा हजार रु पये किमतीचा गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसे तर देवीदास बागुल याच्याकडे चॉपर आढळून आला़ तसेच कारमध्ये मिरची पूड, दोरी असे दरोड्याचे साहित्य आढळून आले़ पोलिसांनी या दोघांकडून कारसह चार लाख दहा हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़ सरकारवाडा पोलीस ठाण्यात या दोघांवर दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सहायक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, रवींद्र पानसरे, कोल्हे, पळशीकर, शेळके, मरकट, वाघमारे यांनी ही कामगिरी केली़ (प्रतिनिधी)
दरोड्याच्या तयारीतील सराईत गुन्हेगारांकडून देशी कट्टा जप्त
By admin | Updated: June 30, 2016 00:09 IST