नाशिक : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी (दि. १६) होणार आहे. केवळ नाशिकच नव्हे, तर संपूर्ण देशभरातील निकाल ऐकण्यासाठी नागरिक आतुर झाले आहेत. काहींनी निकाल एन्जॉय करण्याची तयारी सुरू केली आहे. कॉलेजरोडवर मोठ्या पडद्यावर निकाल बघण्याची सोय संस्कृती अभियानने केली आहे, तर अनेक उत्साही मंडळींनी निकाल बघता बघता स्नेहभोजनाचा आनंद घेण्यासाठी प्रायव्हेट पार्ट्यांचेही आयोजन केले आहे.देशभरात औत्सुक्याचा विषय असलेल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल शुक्रवारी लागणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत प्रचारासाठी सोशल मीडिया, व्हॉट्स ॲप, फेसबुक अशा साधनांचा वापर करण्यात आल्याने देशभरात महिनाभरापासून इलेक्शन फिव्हर होता. तरुणाईने यंदा प्रथमच निवडणुकीत रस घेतल्याचे दिसून आले. त्यामुळेच यंदा मतदानाचा टक्काही वाढला आहे. त्यामुळे यंदा निकालाबद्दलदेखील उत्सुकता आहे. १२ मे रोजी अखेरच्या टप्प्यातील मतदान संपताच दूरचित्रवाहिन्यांनीदेखील एक्झीट पोल दाखवून मतदारांची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. त्यामुळेच आता शुक्रवारच्या निकालाकडे लक्ष लागून आहे. भाजपाचे नितीन वानखेडे यांनी आपल्या संस्कृती अभियान या संस्थेच्या वतीने कॉलेजरोडवर बीवायके कॉलेजसमोर मोकळ्या भूखंडावर दहा बाय पंधराचा एलईडी स्क्रीन उभारला असून, त्यावर निकाल पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, देशात भाजपाची सत्ता येणारच हे गृहीत धरून गुलाल उधळण्याची आणि फटाके फोडण्याची तयारीही करण्यात आली आहे.नाशिकमधील अनेक हॉटेल्समध्ये मोठ्या स्क्रीनवर सध्या आयपीएलचे सामने दाखविण्यात येत आहेत. तेथेही निकाल पाहण्याची सोय करून देण्यात आली आहे. याशिवाय राजकारणात रस असलेल्या अनेक लोकांनी दूरचित्रवाणीवर निकाल बघता बघता स्नेहभोजनासह प्रायव्हेट पार्ट्या आयोजित करण्यात आल्या आहेत.
शहरात काउंटिंग फिव्हर निकाल मोठ्या पडद्यावर : प्रायव्हेट पार्ट्यांचे नियोजन
By admin | Updated: May 16, 2014 00:19 IST