सिडको : गेल्या दोन महिन्यांपासून येथील प्रभाग क्रमांक २९ मध्ये घंटागाड्या नियमित येत नसल्याने प्रभागात ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचलेले असून, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत प्रभागाच्या नगरसेवक रत्नमाला राणे यांनी प्रभागातील घंटागाड्याच ताब्यात घेतल्या. मात्र, संबंधित ठेकेदाराने नगरसेवकांना न जुमानता थेट अंबड पोलीस ठाणे गाठले. परंतु काही तक्रार न देता ठेकेदाराने माघार घेणेच पसंत केल्याचा प्रकार शनिवारी घडला.सिडकोतील प्रभाग क्रमांक २९ मधील उत्तमनगर, सर्वेश्वर चौक, नंदनवन चौक, वासुदेव चौक, राजरत्ननगर यांसह परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून घंटागाडी अनियमित येत असल्याने याबाबत नागरिकांनी नगरसेवक रत्नमाला राणे यांना कळविले. प्रभागात ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचलेले असून, घरातील कचरादेखील घेण्यासाठी घंटागाडी येत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांना डेंग्यू तसेच स्वाइन फ्लूसदृश आजाराने ग्रासले असल्याचेही नगरसेवकांच्या लक्षात आणून दिले. याबाबत नगरसेवक राणे यांनी मनपाच्या संबंधित अधिकाºयांना अनेकदा कळविले, परंतु संबंधित ठेकेदार हे नगरसेवकांनाही जुमानत नसल्याने रत्नमाला राणे यांनी प्रभागात अनियमित फिरणाºया घंटागाड्या शोधून त्या ताब्यात घेतल्या. याबाबतची माहिती घंटागाडी ठेकेदारास कळताच त्यांनी थेट नगरसेवकांच्या विरोधातच अंबड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी धाव घेतली. परंतु ठेकेदाराने तक्रार न देताच माघारी फिरणेच पसंत केले. प्रभागात घंटागाडी अनियमित येत असल्याबाबत नगरसेवक राणे यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली, तसेच राणे यांना यापुढील काळात प्रभागातील घंटागाडी बाबतच्या सर्व तक्रारींचे निवारण केले जाईल, असे लेखी पत्र दिले.
नगरसेवकाने घेतला घंटागाड्यांचा ताबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:38 IST