नाशिक : महापालिका निवडणुकीत चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे सात प्रभागांमध्ये १७ विद्यमान नगरसेवक आमने-सामने लढत देत आहेत, तर गटांमध्ये ६६ गटांमध्ये सिंगल नगरसेवकांसमोर माजी नगरसेवकांसह नव्या चेहऱ्यांचे आव्हान आहे. नगरसेवक विरुद्ध नगरसेवक लढतीत कोणत्या नऊ नगरसेवकांना घरी बसावे लागेल, हे येत्या २३ फेब्रुवारीला मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी यंदा चार सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली आहे. यंदा ३१ प्रभागमिळून ८२१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यात विद्ममान १२२ पैकी तब्बल ८२ नगरसेवकांचा समावेश आहे. ३१ प्रभागांमधील ६६ गटांमध्ये लढत देणारे प्रत्येकी एक नगरसेवक आहे. मात्र, सात प्रभागांमध्ये १७ नगरसेवकांची लढत नगरसेवकांशीच आहेत. प्रभाग क्रमांक ६ मध्ये विद्यमान महापौर अशोक मुर्तडक यांच्यासमोर भाजपाकडून नगरसेवक दामोदर मानकर यांचे आव्हान आहे. सन २०१२ मध्ये मानकर हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी मनसेसोबत आघाडी करत सत्तापदे उपभोगली. आता मनसेचेच अशोक मुर्तडक यांना त्यांनी आव्हान दिले असले तरी मुर्तडक यांची वरचढ बाजू पाहता मानकर यांना निवडणूक पाहिजे तितकी सोपी नाही. प्रभाग १३ मध्ये मनसेतून भाजपात गेलेल्या नगरसेवक माधुरी जाधव आणि कॉँग्रेसच्या नगरसेवक वत्सला खैरे यांच्यात लढत आहे. प्रभाग १३ मध्ये कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे अशी आघाडी झाल्याने माधुरी जाधव यांना कडवा संघर्ष करावा लागणार आहे. प्रभाग १५ मध्ये मनसेतून कॉँग्रेसमध्ये गेलेले नगरसेवक गुलजार कोकणी, शिवसेनेचे नगरसेवक सचिन मराठे व मनसेचे स्वीकृत नगरसेवक संदीप लेनकर यांच्यात लढत आहे. याठिकाणी सेनेचे नगरसेवक सचिन मराठे यांच्या काही जमेच्या बाजू असल्याने त्यांचा मुकाबला करताना कोकणी व लेनकर यांचीही कसोटी लागणार आहे. प्रभाग १६ मध्ये कॉँग्रेसचे राहुल दिवे व भाजपाचे प्रा. कुणाल वाघ हे आमनेसामने आहेत. आजवर मित्रत्वाचे नाते सांभाळणारे दिवे-वाघ यांच्यापैकी कुणाला एकाला तरी नारळ मिळणार आहे. प्रभाग १९ मध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक हरिष भडांगे हे बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी करत आहेत, तर त्यांच्यासमोर भाजपाकडून कन्हय्या साळवे यांचे आव्हान आहे. याठिकाणीही साळवे यांचा जनसंपर्क लक्षात घेता भडांगे यांना मेहनत घ्यावी लागणार आहे. प्रभाग २४ मध्ये कॉँग्रेसच्या नगरसेवक अश्विनी बोरस्ते व सेनेच्या कल्पना पांडे यांच्यात लढत आहे. दोन्ही उमेदवार मातब्बर असल्याने काट्याची लढत शक्य आहे. प्रभाग ३० मध्ये तब्बल चार नगरसेवक लढत देत आहेत. त्यातील ‘क’ गटात मनसेतून भाजपात दाखल झालेल्या डॉ. दीपाली कुलकर्णी व अपक्ष रशिदा शेख तर ‘ड’ गटात अपक्ष संजय चव्हाण व भाजपाकडून सतीश सोनवणे निवडणूक रिंगणात आहेत. डॉ. दीपाली कुलकर्णी यांना भाजपाच्या उमेदवारीमुळे बुस्ट मिळाला असला तरी मतविभागणीचा फायदा कितपत होतो, यावरच त्यांच्या विजयाचे गणित अवलंबून असेल. संजय चव्हाण व सतीश सोनवणे यांच्यातही काट्याची लढत पाहायला मिळणार आहे. (प्रतिनिधी)
नगरसेवक विरुद्ध नगरसेवक
By admin | Updated: February 14, 2017 01:36 IST