लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेत विविध समित्या गठीत होत असतानाच शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागामार्फत मनपा हद्दीतील विधानसभा मतदारसंघनिहाय विद्युत वितरण नियंत्रण समित्या गठीत करण्याचे अधिकार आयुक्तांना दिले आहेत. या समित्यांवर शहरातील चारही मतदारसंघांतील प्रभाग समिती सभापतींसह प्रत्येक १० नगरसेवकांची सदस्य म्हणून नियुक्ती केली जाणार आहे याशिवाय, प्रत्येकी सात अशासकीय सदस्यांच्याही नियुक्त्या होणार आहेत. आमदारांच्या अध्यक्षतेखाली या समित्यांचे कामकाज चालणार आहे. महावितरणचा कारभार पारदर्शक व प्रभावी चालविण्यासाठी व ग्राहकांना उत्तम व दर्जेदार सेवा पुरविण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर विद्युत वितरण नियंत्रण समित्या गठीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महापालिका क्षेत्रात यापूर्वी अशा समित्या कार्यरत नसल्याने शासनाने आता विधानसभा मतदारसंघनिहाय समित्या गठीत करण्याचा निर्णय घेतला असून, समित्या गठीत करण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना दिले आहेत. या समित्यांचे अध्यक्ष त्या-त्या विधानसभा मतदारसंघातील आमदार असणार आहेत. सहअध्यक्ष म्हणून इतर विधानसभा सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. तसेच महावितरणचे कार्यकारी अभियंता यांचा समावेश असणार आहे. समित्यांवर सदस्य म्हणून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रभाग सभापती, प्रत्येकी दहा नगरसेवक यांना संधी दिली जाणार असून, महापालिकेचे उपआयुक्त, विभागीय अधिकारी, तहसीलदार अथवा नायब तहसीलदार यांची नियुक्ती केली जाणार आहे. सदस्य सचिव म्हणून महावितरणचे उपविभागीय अभियंता असतील.
विद्युत समित्यांवर नगरसेवकांना संधी
By admin | Updated: June 11, 2017 00:35 IST