सिन्नर : राज्यातील शाळा दि. ४ जानेवारीला सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील नववी ते बारावीच्या ६९१ शिक्षकांची कोरोना चाचणी सुरू करण्यात आली आहे. यातील १४९ शिक्षकांनी दोन दिवसांत घशाचे नमुने तपासणीसाठी दिले. उर्वरित ५४२ शिक्षकांची दोन दिवसांत कोरोना चाचणी पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी मंजूषा साळुंखे यांनी दिली. शाळा सुरू करण्यापूर्वी नववी ते बारावी वर्गाला शिकविणाऱ्या शिक्षकांची कोरोना चाचणी पूर्ण करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार, तालुकापातळीवर शिक्षण विभागाने नियोजन आखले. तालुक्यातील ८१ शाळांतील मुख्याध्यापक, लिपिक, शिपाई, गणित, इंग्रजी व विज्ञानाच्या प्रत्येकी एका शिक्षकाची चाचणी सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर, जास्त पटसंख्या असलेल्या शाळांतील इतर शिक्षकांची चाचणी घेण्यात येणार आहे. मागील महिन्यांत ३५० शिक्षकांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यात तीन शिक्षक पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. आता पुन्हा नव्याने चाचणी सुरू करण्यात आल्याने किती शिक्षक बाधित आहेत, याचा अहवाल दोन दिवसांत प्राप्त होणार आहे.
सिन्नर तालुक्यातील ५०० शिक्षकांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 17:33 IST