नाशिक : कोरोनाने संपूर्ण विश्वाला मोठ्या संकटात टाकलेले असून, या महामारीच्या संकटाचा फटका मनोरुग्णांनादेखील मोठ्या प्रमाणात बसला आहे. कोरोना काळात बहुतांश मनोरुग्णांना डॉक्टरांची प्रत्यक्ष भेट, समुपदेशन शक्य न झाल्याने त्यांच्या वर्तनातील असंतुलनात मोठीच वाढ झाली, तसेच कामकाज बंद झाल्याने किंवा नोकरी गेल्याने नैराश्य आणि चिंतेसारख्या विकारांनी ग्रासलेल्या मनोरुग्णांच्या प्रमाणातही १० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
प्रचंड मोठ्या प्रमाणात येणारे मानसिक ताणतणाव, चिंता, नैराश्य हे मनोरुग्ण असण्याचे प्रमुख लक्षण मानले जाते. गत दशकात देशात दर सात व्यक्तींमागे एक व्यक्ती विविध प्रकारच्या मानसिक आजाराने ग्रस्त होती. १९९० च्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट होते. गेल्या तीन वर्षांमध्ये ही संख्या आणखी वाढली आहे. भारतातील मनोरुग्णांमध्ये नैराश्य, चिंता, स्किझोफ्रेनिया या विकृतींनी सर्वाधिक रुग्ण ग्रस्त आहेत. मानसिक रुग्णांची ही संख्या मोठी आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे मानसिक रोगांकडे फारसे लक्ष दिले जात नाही. वास्तविक सर्वसामान्य आरोग्यचिकित्सा सेवांमध्ये मानसिक आरोग्यसेवांचा समावेश व्हायला हवा. देशाने २०१७ साली पहिला मानसिक आरोग्य कायदाही केला आहे. मनोरुग्णांच्या प्रतिष्ठेचे रक्षण, तसेच त्यांच्यावरील उपचारांदरम्यान गोपनीयता राखण्याचा त्यात समावेश आहे. भारतात ४,५०० डॉक्टर्स सायक्रिअॅट्रिस्ट आहेत. प्रत्यक्षात देशाला २० हजार सायकॉलॉजिस्ट-समुपदेशकांचीही अत्यंत आवश्यकता आहे, तसेच मनोरुग्णांच्या उपचारांसाठी, त्यांचे मानसिक आजार बरे, कमी करण्यासाठी आपल्या देशात सोयींची कमतरता आहे. हे खरे असले तरी काही निवडक राष्ट्रीय संस्था, राज्यस्तरावरील इस्पितळे त्याबाबत चांगली कामगिरी करीत आहेत. महाराष्ट्रात पुणे, नागपूर, ठाणे व रत्नागिरी येथे अशा संस्था कार्यरत आहेत.
इन्फो
मनोविकारांबद्दल जागरूकता
मनोविकारांबद्दल लोकांमध्ये जाणीव, जागरूकता वाढते आहे. मनोरुग्णांवर उपचार केले तर ते बरे होऊ शकतात हे लोकांना समजू लागले आहे. मनोविकारांवर उपचार घेणाऱ्यांपैकी एकतृतीयांश व्यक्तींमध्ये त्यांचा आजार पुन्हा उद्भवू शकतो. एकतृतीयांश रुग्ण हे आयुष्यभर सतत औषधांमुळे सुधारतात; परंतु एकतृतीयांश रुग्णांवर कालांतराने औषधांचा गुणकारी परिणाम होत नाही, असाही काही तज्ज्ञांचा अनुभव आहे.
कोट
मनोविकारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांमध्येदेखील कोरोना कालावधीत मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. काही रुग्णांशी फोनद्वारे, तर काहींशी व्हिडिओ कॉलिंगद्वारे संपर्क साधून त्यांचे समुपदेशन करण्यात येत होते. मात्र, प्रत्यक्ष भेटीतून होणारे समुपदेशन आणि फोनद्वारे होणाऱ्या समुपदेशनात फरक पडतो, तसेच नवीन रुग्णांच्या संख्येतही कोरोना काळात सुमारे १० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
-डॉ. जयंत ढाके, मनोविकारतज्ज्ञ