महापालिका भरणार कंत्राटी वाहनचालक
By admin | Published: September 17, 2016 12:41 AM2016-09-17T00:41:52+5:302016-09-17T00:42:44+5:30
अपुरी संख्या : ६० चालकांसाठी मागविल्या निविदा
नाशिक : वाहने आहेत पण चालक नाहीत, अशी स्थिती महानगरपालिकेची बनलेली आहे. वाढत्या आस्थापना खर्चामुळे नोकरभरतीस मनाई आहे. त्यामुळे मनपाने अखेर वाहनचालकांचे कंत्राट देण्याचा निर्णय घेतला असून, सुमारे ६० वाहनचालकांसाठी पावणे दोन कोटी रुपये खर्चाची निविदा काढली आहे. निवृत्तीमुळे घटत चाललेल्या वाहनचालकांच्या संख्येमुळे यापुढे महापालिकेच्या वाहनांच्या चाव्या कंत्राटी चालकांच्या हाती असणार आहेत.
महापालिकेत पदाधिकाऱ्यांसह अधिकारी वर्गासाठी वाहनांचा वापर केला जातो. याशिवाय विविध विभागांसाठीही वाहनांचा वापर होतो. सद्यस्थितीत महापालिकेकडे विविध प्रकारची २३० वाहने असून, त्यातील ३६ वाहने लिलावात निघण्याच्या तयारीत आहेत. सुमारे ३० वाहने ही वाहनचालकांअभावी पडून आहेत. त्यांचा वापर केला जात नाही. महापालिकेकडे आजमितीला १५५ वाहनचालक आहेत, तर वाहनांची संख्या लक्षात घेता सुमारे ४५ ते ५० वाहनचालकांची आवश्यकता आहे. प्रामुख्याने, अग्निशामक दलाला वाहनचालकांची मोठ्या प्रमाणावर निकड भासते. दलाकडे पुरेसे वाहनचालक नसल्याने चालकांना तीन सत्रांत काम करावे लागते. त्यामुळे कामाचा ताण वाढतो. अग्निशामक दलाने वाहनचालकांची मागणी वारंवार केलेली आहे. याशिवाय, अन्य विभागांकडूनही वाहनचालकांची मागणी होत असते. वाहनचालकांच्या निवृत्तीचेही प्रमाण वाढत चालल्याने कर्मचारीसंख्या घटत चाललेली आहे. त्यामुळे वाहनचालक पुरविण्याबाबत यांत्रिकी विभागाला नेहमीच पेच पडलेला असतो. वाहनचालकांची निकड लक्षात घेऊन महासभा व स्थायी समितीने कंत्राटी पद्धतीने वाहनचालक भरतीला मान्यता दिली होती. त्यानुसार, यांत्रिकी विभागाने ६० वाहनचालक भरण्यासाठी कंत्राट देण्याचे ठरविले असून, त्यासाठी एक कोटी ६० लाख रुपये खर्चाची निविदा काढली आहे. (प्रतिनिधी)