सुरक्षेसाठी अधिकार्यासह कर्मचार्यांची नेमणूकनाशिक : मध्यवर्ती कारागृहातून जिल्हा न्यायालयात तारखेसाठी आणलेले कैदी तसेच नातेवाइकांकडून झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव कैद्यांचे वाहन उभे करण्याच्या जागेवर तंबूची उभारणी करण्यात आली असून, पोलीस अधिकारी व कर्मचार्यांचीही नेमणूक करण्यात आली आहे़ सोमवारी पोलीस आयुक्तांनी अधिकार्यांसह या जागेची पाहणी केली होती़ मोक्कातील आरोपी व टिप्पर गँगचे सदस्य व त्यांच्या नातेवाइकांकडून पोलीस उपनिरीक्षकास मारहाण केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती़ या घटनेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी कैदी पार्टीची वाहने उभी करण्यात येणार्या जागेची पाहणी केली, तसेच या ठिकाणी तात्पुरत्या स्वच्छतागृहासह कैदी बॅरेक करण्याबाबत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांशी चर्चा केली होती़या चर्चेनुसार मंगळवारी कैदी वाहने लावण्याच्या जागेवर एका तंबूची उभारणी करण्यात आली असून, एका पोलीस अधिकार्यासह कर्मचार्यांची या ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे़ या जागेवर वाहने लावण्यास तसेच कैद्यांच्या नातेवाइकांना भेटू देण्यासही मज्जाव करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
कैद्यांपासून होणारा उपद्रव रोखण्यासाठी न्यायालयात तात्पुरत्या कैदी बॅरेकची उभारणी
By admin | Updated: May 14, 2014 00:30 IST