नाशिक : जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीच्या बैठकीची माहिती वेळेवर न देणे, भ्रमणध्वनी न उचलणे यासह विविध तक्रारी करीत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना दक्षता समितीचे अध्यक्ष खासदार हरिश्चंद्र चव्हाण व खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी धारेवर धरले. गंगापूररोड येथील एका खासगी हॉटेलमध्ये जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीची त्रैमासिक बैठक झाली. बैठकीच्या सुरुवातीलाच खा. डॉ. सुभाष भामरे व आ. नरहरी झिरवाळ यांनी जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीच्या बैठकीची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून दिली जात नाही. वेळेवर कळविले जाते, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रमुख अरविंद मोरे हे दूरध्वनी उचलत नाही, असे सांगत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी अधिकाऱ्यांना फोन केला होता. माणूसही पाठविला होता. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई प्रस्तावित करतो, असे सांगितले. पंतप्रधान ग्रामसडक योजनेचा शंभर कोटींचा निधी येणे बाकी असल्याचे आढाव्यात संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यावर खासदार चव्हाण व खासदार भामरे यांनी ही योजना राबविताना तालुकास्तरावरील लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच योजना राबवावी,अशी सूचना केली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे एकही अधिकारी अथवा त्यांचे प्रतिनिधी बैठकीला हजर नसल्याने त्याबाबत खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी नाराजी व्यक्त करून याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांना या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत कळविण्याच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे पाणलोट विकास कार्यक्रम राबविताना नाशिक, देवळा तालुक्यांचा समावेश नसल्याचे जि. प. अध्यक्ष विजयश्री चुंबळे व आ. डॉ. राहुल अहेर यांनी निदर्शनास आणून दिले. खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी जलयुक्त शिवार अभियान राबविताना लोेकप्रतिनिधींना विश्वासात न घेता परस्पर गावांची निवड करण्यात आल्याचा आरोप केला. बैठकीस समितीचे अध्यक्ष खासदार हरिश्चंद्र चव्हाण, कार्यकारी अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, खासदार हेमंत गोडसे, खासदार डॉ. सुभाष भामरे,आमदार नरहरी झिरवाळ,आमदार पराग वाजे,आमदार डॉ.राहुल अहेर, पंचायत समिती सभापती गोपाळ लहांगे,अलका चौधरी, संगीता ठाकरे, जयंत वाघ, गणपत वाघ आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
बांधकाम अधिकाऱ्यांची दांडी; अधिकाऱ्यांना धरले धारेवर
By admin | Updated: February 21, 2015 01:20 IST