नाशिक : वर्षभर चालणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शहरात दाखल होणाऱ्या भाविकांसह स्थानिक नागरिकांना दिशादर्शनासाठी नाशिक महापालिकेने ठिकठिकाणी फलक उभारण्याचे काम सुरू केले असून निळ्या रंगातील फलक लक्ष वेधून घेत आहेत. आतापर्यंत दोनशेहून अधिक फलक लावण्यात आल्याची माहिती शहर अभियंता सुनील खुने यांनी दिली.सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शहरात रस्त्यांचे रुंदीकरण होण्याबरोबरच नव्याने रिंगरोडही झाले. शहरातील प्रमुख चौकांसह विविध रस्त्यांवर बाहेरून येणाऱ्या भाविकांना दिशादर्शनासाठी मदत व्हावी याकरिता महापालिकेने फलक उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महापालिकेमार्फत गेल्या सहा महिन्यांपासून शहरातील रस्ते व चौकांचा सर्व्हे सुरू होता. महापालिकेचे १५ अभियंते तसेच संबंधित कंत्राटदारांचे १० सुपरवायझर यांच्या मदतीने सदर सर्व्हे करण्यात आला असून शहरात तीन प्रकारचे दिशादर्शक फलक उभारण्यात येत आहेत. त्यात २.१ मीटरपासून ते ६ मीटर उंचीच्या फलकांचा समावेश आहे. सदर फलक उभारण्याचे काम प्रगतिपथावर असून येत्या दोन महिन्यांत काम पूर्ण होण्याचे नियोजन आहे. निळ्या रंगात सदर फलक उभारले जात असून त्यात इंग्रजी व मराठीत माहिती दिली जात आहे. याशिवाय सामाजिक संदेशही त्यातून दिला जात आहे. सदर फलकांवरील मजकूर तसेच कि.मी. यात कोणत्याही त्रुटी राहू नयेत यासाठी खास तज्ज्ञांची मदत घेण्यात आली आहे. शहरात आतापर्यंत माउंटेड टाइपचे २०० हून अधिक फलक उभारण्यात आले आहेत. त्यामुळे सदर चौक व रस्त्यांचेही सौंदर्य खुलले आहे. (प्रतिनिधी)
पालिकेकडून दिशादर्शक फलकांची उभारणी
By admin | Updated: September 23, 2015 00:22 IST