नाशिक : कोरोनामुळे गत आठ महिन्यांपासून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मास्क आहे. कोरोना दूर ठेवण्यासह अन्य विषाणू आणि संसर्गजन्य आजारही मास्कच्या वापराने रोखता येतात. जिल्हा रुग्णालय, मनपा रुग्णालये तसेच मविप्र वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील रुग्णसंख्येत मोठी घसरण झाली आहे. मास्क वापरामुळे अन्य विषाणूजन्य आजार पसरण्याचा धोका कमी झाल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरण्याविषयी विविध स्तरांतून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. मास्क हा आता दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य भाग बनला आहे. अगदी सामान्यातील सामान्य असो किंवा आलिशान लक्झरी कारमधून प्रवास करणारा असो, बहुतांश नागरिकांच्या तोंडावर किमान बाहेर फिरताना मास्क दिसून येतो. मात्र, तरीही काही व्यक्ती बाहेर जाताना किंवा कार्यालयातही मास्क घालत नाहीत. अशा व्यक्तींना कोरोना झाला नसला तरी विषाणूजन्य आजारांचा धोका अधिक असल्याचे गत सहा महिन्यांतील आकडेवारीतून दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाबरोबरच अन्य विषाणूजन्य आजार टाळण्यासाठी तरी मास्कचा वापर अवश्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
--इन्फो---
मास्कने अनेक आजारांना घातला आळा
मास्कमुळे सर्दी, खोकल्यासह धुळीच्या ॲलर्जीचे आजार अत्यल्प उरले आहेत. त्यामुळे जनरल प्रॅक्टिशनरकडील गर्दी कमी झाली आहे, तर सायनस, घशाचे विकार अशा अनेक आजारांना आळा बसल्याने इएनटी डॉक्टरकडील रुग्णांचे प्रमाणदेखील कमी एक चतुर्थांश झाले आहे. तर स्वाइन फ्लू किंवा हिवाळ्यातील सर्दी, तापाच्या रुग्णांमध्येही गतवर्षीच्या तुलनेत निम्म्याहून अधिक घट आलेली आहे.
--इन्फो--
विषाणूजन्य आजार
नेहमीच्या पर्यावरणात स्वाइन फ्लू, एन्फ्लुएन्झा, चिकुन गुन्या, डांग्या खोकला हे प्रामुख्याने विषाणूजन्य आजार गणले जातात. मास्कचा वापर या आजारांना दूर ठेवण्यात यशस्वी ठरल्याने कोरोनाच्या समाप्तीनंतरदेखील हिवाळ्याच्या दिवसांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कोरोनाचा वापर कायम ठेवल्याचे दिसू शकेल.
कोट
बाह्यरुग्ण विभागात सर्दी, खोकला, स्वाइन फ्लू, चिकुन गुन्या, डांग्याखोकला यासारख्या रुग्णांचे प्रमाण दरवर्षीच्या तुलनेत यंदा घटले आहे. मास्कचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे तसेच हाताची सातत्याने स्वच्छता केली जात असल्याने विषाणूजन्य आजार कमी झाल्याचे दिसत आहे.
डॉ. अनंत पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय