मतदारांना गृहीत धरल्याने शिंदे, पळसेत सत्तांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:16 AM2021-01-20T04:16:20+5:302021-01-20T04:16:20+5:30

नाशिकरोड : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील मोठ्या समजल्या जाणाऱ्या पळसे व शिंदे ग्रामपंचायतीच्या निकालाने गेल्या २० ते २५ वर्षांपासून ...

Considering the voters, Shinde, Palaset is independent | मतदारांना गृहीत धरल्याने शिंदे, पळसेत सत्तांतर

मतदारांना गृहीत धरल्याने शिंदे, पळसेत सत्तांतर

Next

नाशिकरोड : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील मोठ्या समजल्या जाणाऱ्या पळसे व शिंदे ग्रामपंचायतीच्या निकालाने गेल्या २० ते २५ वर्षांपासून एकछत्री अंमल असलेल्या पळसेचे जगन आगळे व शिंदेगावचे संजय तुंगार यांना जोरदार झटका दिला आहे. निवडणुकीत केलेली युती, उड्डाण पुलाचे काम, विधानसभा निवडणुकीत केलेले काम, मतदारांना गृहीत धरणे व अती आत्मविश्वासामुळे दोघांच्या राजकीय घोडदौडीला लगाम बसला आहे.

पळसे व शिंदेगाव ग्रामपंचायत ही नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील मोठी ग्रामपंचायत असून या दोन्ही गावात कुठल्या पक्षाचे वर्चस्व आहे त्यावरून तालुक्याच्या पूर्व भागात इतर राजकीय समीकरणे व गणिते ठरली जात होती. शिंदे - पळसे दोन्ही गावांमध्ये गेल्या २० ते २५ वर्षांपासून शिवसेनेचा एकछत्री अंमल आगळे व तुंगार यांच्या नेतृत्वाखाली सुरू होता. दोन्ही गावातून काँग्रेस जवळपास संपुष्टात आली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असून सुद्धा ते गेल्या २० वर्षात शिवसेनेला मागे टाकण्यात कधीच यशस्वी झाले नाही. ग्रामीण भागामध्ये भाजपला अद्याप म्हणावे तसे आपली पाळेमुळे रुजवता आलेली नाही. तर मनसे पाय रुजविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. गेल्या दहा वर्षात लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांशी त्यांच्याच लोकांनी स्वतःचे राजकीय व आर्थिक हित संभाळून केलेल्या कामाची परतफेड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत झाल्याचे अदृश्य स्वरूपात दिसत आहे. पळसे ग्रामपंचायतीमध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून जगन आगळे यांचे वर्चस्व होते. मात्र या निवडणुकीत गेल्या पंचवीस वर्षापासून एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे तानाजीराव गायधनी यांच्याशी आगळे यांनी जमवून घेत युती केली. निवडणुकीत झालेली ही राजकीय युती अनेकांच्या पचनी पडली नाही. त्यामुळे आगळे यांच्या राजकीय घोडदौडीला लगाम बसला आहे. तोच प्रकार शिंदेगाव ग्रामपंचायतीच्याबाबत घडला. शिवसेनेच्या संजय तुंगार यांची गेल्या २० वर्षापासून सत्ता होती. मात्र गेल्या काही निवडणुकीत गावाच्या विकासाचे नाव पुढे करून तुंगार यांनी घेतलेली राजकीय भूमिका अनेकांना खटकली होती. गेल्या दोन वर्षापासून सत्तारूढ गटात वैचारिक वाद वाढीस लागले. त्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीचे ठरणार असल्याचे पहिल्यापासूनच स्पष्ट होते. दोन्ही गावांमध्ये शिवसेनेत सरळ सरळ गट पडल्याने मूळ गटाला शह द्यायचा असेल तर दुसऱ्या गटाशी हात मिळवणी करणे हे सूत्र पारंपरिक इतर पक्षाच्या विरोधकांनी लक्षात घेऊन तशी पावले टाकली. नाशिक-पुणे चौपदरी महामार्गावरील शिंदे गावातील उड्डाणपुलाने गावाचे अर्थकारण बिघडून गेले. सत्ताधाऱ्यांनी कंत्राटदार व टोलनाका ठेकेदार यांचे हित बघितल्याचा राग ग्रामस्थांच्या मनात दडलेला होता. त्याचा फटका तुंगार यांना बसला. दोन्ही गावांमध्ये युवकांनी घेतलेल्या पुढाकारामुळे सत्तांतर होऊन दोन्हीही ग्रामपंचायतीच्या चाव्या युवकांच्या हाती आल्या आहेत. यामुळे आगळे व तुंगार यांच्या राजकीय वाटचालीला खिळ बसली आहे. या निवडणुकीत स्थानिक राजकारण, प्रश्न व नातेसंबंधावर लढविली गेली.

Web Title: Considering the voters, Shinde, Palaset is independent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.