प्रशासनाचे आदेश शनिवारी सर्व ग्रामपंचायतींना प्राप्त झाले असून, ग्रामसभा घेण्यास प्रशासनाने होकार कळविला असला, तरी ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यात जमावबंदी व संचारबंदी लागू केली असल्याने, पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामसभेसाठी गर्दी झाल्यास कायद्याचा भंग होणार असल्याचे ग्रामसेवकांचे म्हणणे आहे. याशिवाय ग्रामसभेसाठी सात दिवस अगोदर नोटीस जारी करावी लागते. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला याबाबतचे आदेश प्राप्त झाल्याने दुसऱ्याच दिवशी ग्रामसभा घेतल्यास ती कायदेशीर वैध मानली जाणार नाही. अशा ग्रामसभेत घेतल्या जाणाऱ्या निर्णयाबाबत कायदेशीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, याची भीती ग्रामसेवकांना वाटू लागली आहे. त्यामुळे जोपर्यंत ग्रामसभेबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून लेखी सुस्पष्ट आदेश प्राप्त होत नाही, तोपर्यंत कोणीही ग्रामसभा आयोजित करू नये व संचारबंदी आदेशाचा भंग करू नये, असे आवाहन राज्य ग्रामसेवक युनियनने केले आहे. त्यामुळे रविवारी ग्रामसभा होणार किंवा नाही, याबाबत ग्रामपंचायतींचे सरपंच व नागरिकांमध्ये संभ्रम कायम आहे.
आजच्या ग्रामसभेबाबत ग्रामसेवकांमध्ये संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:18 IST