लोहोणेर : गेल्या तीन-चार वर्षांपासून गारपीट, अवकाळी पावसाला तोंड देत असलेल्या देवळा तालुक्यात यावर्षीही अत्यल्प पावसाने एकही पीक शेतकऱ्यांच्या हाती आलेले नसताना जिल्हा बँकेच्या वतीने सक्तीची कर्जवसुली सुरू आहे. कर्जवसुली थांबवून दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घ्यावा, अशा मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवसेनेच्या वतीने तहसीलदार कैलास पवार यांना देण्यात आले. गेल्या तीन-चार वर्षांपासून गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. यावर्षीही शेतकऱ्यांंना खरीप तसेच रब्बी हंगामात काहीही हाती लागलेले नाही. दुष्काळाशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी तसेच जनावरांच्या चाऱ्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची भ्रांत पडली असताना जिल्हा बँकेकडून सक्तीची कर्जवसुली सुरू आहे. शासनाने कर्जवसुली थांबवून दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी देऊन शेती व्यवसाय सुरळीत करण्यासाठी नव्याने कर्ज उपलब्ध करून द्यावे, तसेच जनावरांसाठी ठिकठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात, दुष्काळग्रस्त भागातील जनतेसाठी दोन व तीन रु पये किलोप्रमाणे गहू व तांदूळ देण्याची घोषणा केली असली तरी तिची अंमलबजावणी होत नसल्याने याबाबत कार्यवाही करून दिलासा द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी तालुकाध्यक्ष रवींद्र शेवाळे, शिवसेना विभागप्रमुख प्रशांत शेवाळे, शाखाप्रमुख अनुप शेवाळे, निवृत्ती बिरारी, अमोल बिरारी, माणिक शेवाळे, बापू शेवाळे, सुरेश शेवाळे, निंबा शेवाळे, संभाजी शेवाळे, चेतन शेवाळे उपस्थित होते. (वार्ताहर)
जिल्हा बँकेच्या वतीने सक्तीची कर्जवसुली
By admin | Updated: March 8, 2016 23:02 IST