नाशिक : नवीन नोटांमध्ये बनावट नोट ओळखणार कशी याची नागरिकांना चिंता लागली आहे़ त्यातच दोन हजार रुपयाची बनावट नोट बाहेर आल्याचे तसेच या नोटेचा रंग उडत असल्याच्या माध्यमातील बातम्यांमुळे या चिंतेत अधिकच भर पडली आहे़ या चिंतेतूनच एका नागरिकाने सरकारवाडा पोलीस ठाण्यात पोलिसांनी बनावट नोटांबाबत गुन्हे दाखल करावेत, तसेच या नोटा ओळखण्याबाबत वरिष्ठांना माहिती कळवावी, असा अर्ज केला आहे़शरणपूररोड परिसरातील रहिवासी विलास मधुकर देसले यांनी सोमवारी (दि़१४) सरकारवाडा पोलीस ठाण्यात विनंती अर्ज केला आहे़ या अर्जामध्ये त्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि़८) चलनातील पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्याची घोषणा केली़ यानंतर शासनाने दोन हजार रुपयांची नवीन नोट चलनात आणली आहे़ मात्र, दोन हजार रुपयांची नवीन नोट चलनात येऊन एक-दोन दिवस होत नाही तोच कोलकाता येथे बनावट नोटा बाजारात आल्याची बातमी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली़ चलनातील या नवीन दोन हजार रुपयांच्या नोटेचा रंग उडत असल्याचे इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी प्रसारित केल्याने नागरिक आणखीच चिंताग्रस्त झाले आहेत़ पूर्वीच्या चलनी नोटांमध्ये बनावट नोटा कशा ओळखाव्यात याबाबत नागरिकांना ज्ञान होते वा बँकांमध्ये तसे मशीनही उपलब्ध होते़ मात्र, चलनातील नवीन नोटांमध्ये कोणती नोट बनावट आहे हे कसे ओळखणार? तसेच याबाबत शासनाने कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन केलेले नाही़ (प्रतिनिधी)
दोन हजाराच्या नोटेबाबत तक्रार
By admin | Updated: November 15, 2016 02:21 IST