यंदा सर्वत्र वेळेवर व समाधानकारक पर्जन्य होईल असा अंदाज वेधशाळेने वर्तविला होता, त्यामुळे दरवर्षी निराशेच्या छायेत वावरणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. पावसाळा सुरू झाला आणि बळीराजा जोमाने शेतीच्या कामाला लागला. बियाणे खरेदी केली. खतांचा पुरेसा साठा जमा करून ठेवला. चांगल्या पावसाची अपेक्षा असताना पावसाने मात्र हुलकावणी दिल्याने यंदा जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पेरण्या उशीराने सुरू झाल्या होत्या. मृग नक्षत्राने पाठ फिरविल्याने व अद्यापपर्यंत समाधानकारक पाऊस झाला नसल्याने येवला व चांदवड तालुक्यातील शेतकर्यांसमोर दुबार पेरणीचे संकट ‘आ’ वासून उभे आहे. येत्या तीन-चार दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास ज्या ठिकाणी पेरणी झाली त्या ठिकाणची पिके जळण्याच्या मार्गावर असून बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.
दि. २६ जुलै रोजी पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या इगतपुरीत ६२ मि.मी, पेठमध्ये ८२ मि.मी., त्र्यंबकमध्ये ५७ मि. मी. तर सुरगाण्यात ७६.२ मि. मी पावसाची नोंद झाली असताना नाशिक (१८.६), दिंडोरी (२२), मालेगाव (७), कळवण (१५), बागलाण (१६), देवळा (३.२), निफाड (१७.४), सिन्नर (१२) व येवला तालुक्यात अवघ्या १ मि.मी. पावसाची नोंद झाली. मात्र, नांदगाव आणि चांदवड तालुक्याला पूर्णपणे कोरडे ठेवले. नाशिक, इगतपुरी, पेठ, त्र्यंबक व सुरगाणा वगळता जिल्ह्यात इतरत्र कोठेही जोरदार पाऊस न झाल्याने दरवर्षी ओसंडून वाहणारे नदी-नाले यंदा खळाळून वाहू शकलेले नाहीत. रिमझिम स्वरुपाच्या पावसामुळे मात्र पिकांना जीवदान मिळाले असल्याने त्यावर शेतकऱ्यांना समाधान मानण्याची वेळ आलेली आहे.
इन्फो...
पेठमध्ये पर्जन्यात वाढ
मागील वर्षाच्या जुलै महिन्यात झालेल्या पावसापेक्षा यंदा पेठमध्ये ७१२ मि.मी. या खालोखाल सुरगाण्यात ४९२.४ मि.मी.,त्र्यंबकमध्ये ४१३ मि.मी., इगतपुरीत २९३ मि. मी. , दिंडोरीत २६ मि. मी. अधिक पावसाची अधिक नोंद झाली आहे. तर
नाशिक, मालेगाव, नांदगाव, चांदवड, कळवण, बागलाण, देवळा, निफाड, सिन्नर व येवला तालुक्यांमध्ये कमी पर्जन्य झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच आली आहे.
२६ जुलैपर्यंतचा पाऊस(मिलिमीटरमध्ये)
तालुका २०२० २०२१
नाशिक ३४३.६ १७३.५
इगतपुरी १४२०.० १७१३.०
दिंडोरी १९६.० २२२.०
पेठ ४०५.४ १११७.४
त्र्यंबक ४६२.० ८७५.०
मालेगाव ५१४.० २०३
नांदगाव ३९५.० १७०.०
चांदवड २४४.० १२२.०
कळवण २८३.० १९३.०
बागलाण ५२५.० २२५.०
सुरगाणा ४३१.४ ९२३.८
देवळा ३२८.१ १७९.८
निफाड २३४.२ २२६.२
सिन्नर ५०५.० १५८.०
येवला ३३७.० ११४.०