नाशिक : आंध्र प्रदेशातील राजमुंदरी येथे स्नानासाठी जमा झालेल्या लाखो भाविकांमध्ये चेंगराचेंगरी होऊन २७ भाविक मृत्युमुखी पडल्याच्या घटनेचे विश्लेषण करण्यात येऊन त्यादृष्टीने सिंहस्थात गर्दीचे नियोजन केले जाईल, अशी माहिती देऊन कुंभमेळ्याची तयारी जवळजवळ पूर्ण झाल्याने आता फक्त गर्दीचे व्यवस्थापन हाच मुद्दा महत्त्वाचा असल्याचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी सांगितले. नाशिक येथील सिंंहस्थ कुंभमेळ्याचा धर्मध्वजारोहण सोहळा पार पडत असताना आंध्र प्रदेशात चेंगराचेंगरीची घटना घडल्याने गत सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिकला झालेल्या दुर्घटनेची आठवण झाली. तथापि, जिल्हा प्रशासनाने सिंहस्थ कुंभमेळ्यात कोणतीही आपत्ती घडू नये त्यादृष्टीने तयारी केल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. ते पुढे म्हणाले, गेल्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीची घटना लक्षात घेऊनच सिंहस्थाचे नियोजन करण्यात आले असून, आवश्यक ती सारी खबरदारी घेण्यात आली आहे. गर्दीचे व्यवस्थापन करण्याच्या हेतूने येत्या १७, १८ जुलै रोजी जगन्नाथपुरी येथे निघणाऱ्या रथयात्रेची पाहणी व माहिती घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे पथक जाणार आहे. याशिवाय सध्या करण्यात आलेल्या नियोजनात अशा प्रकारची दुर्घटना घडू नये म्हणूनच काही रस्ते वाहतुकीसाठी बंद, तर काही ठिकाणांची वाहतूक वळविण्यात आलेली आहे.
सिंहस्थात गर्दीचे नियोजन
By admin | Updated: July 15, 2015 02:03 IST