नाशिक : विधानसभा निवडणुकीत चुकीचे मतदान केल्याच्या कारणावरून वृद्ध महिलेला जिवंत जाळल्याच्या येवला तालुक्यातील घटनेची राज्य निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविल्याने विशेष दंडाधिकाऱ्यांसमोर पुन्हा फेरजबाब घेण्यात आला. त्यात मात्र सदर महिलेने संदिग्ध माहिती दिल्याचे समोर आले. बुधवारी, १५ आॅक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दुपारी येवला तालुक्यातील बाभुळगाव येथे ही घटना घडली होती. झेलूबाई वाबळे या वृद्धेने दोन क्रमांकाच्या उमेदवाराऐवजी तीन क्रमांकाच्या उमेदवाराला का मत दिले याचा राग धरून तिघा संशयितांनी तिला अंगावर घासलेट ओतून पेटवून दिल्याची घटना घडली होती. महिलेने दिलेल्या जबाबाच्या आधारे येवला पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली. दरम्यान, या प्रकरणाला राजकीय वळण मिळाल्याने निवडणूक आयोगाने त्याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांकडून वस्तुनिष्ठ अहवाल मागविला होता. त्या आधारे विशेष दंडाधिकाऱ्यांमार्फत शनिवारी झेलूबाईचा जबाब घेण्यात आला असता, तिने घटनेची संदिग्ध माहिती दिली. त्यामुळे नेमके तिला खरोखर पेटवून देण्यात आले की तो अपघात होता, याचा कोणताही निष्कर्ष महसूल विभाग काढू शकले नाही. तोच अहवाल अंतिम करून आयोगाला कळविण्यात आल्याचे समजते. (प्रतिनिधी)