नाशिक : गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने शहर व जिल्ह्याला झोडपल्यानंतर आता तपमानात बदल होत असून, थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे सकाळी व सायंकाळी नाशिककरांना बोचरी थंडी जाणवू लागली आहे.शनिवारचे तपमान किमान १३.४, तर कमाल ३०.८ डिग्री सेल्सियस होते. त्यामुळे शनिवारी सायंकाळनंतरच वातावरणात गारवा जाणवू लागल्याने नाशिककरांनी गरम व उबदार कपडे घातल्याचे चित्र पाहावयास मिळाले. पावसानंतर थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने यापूर्वीच वर्तविली आहे.गेल्या काही दिवसांपासून वातावरणात आॅक्टोबर उलटूनही आॅक्टोबर हिट जाणवत होती. मात्र अचानक अवकाळी पावसाने चार ते पाच दिवस हजेरी लावली. ऐन थंडीत पावसाळा सुरू झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. त्यातच पाऊस थांबल्यानंतर थंडीचा वाढण्याचा हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला असून, थंडीचा कडाका वाढल्याने सायंकाळनंतर हवेत गारवा वाढला असून, रात्री दहानंतर बोचरी थंडी जाणवू लागली आहे. पहाटेही थंडीचा कडाका जाणवत असल्याने पहाटेचा व्यायाम करणाऱ्या व सकाळी सकाळी पायी चालणाऱ्या नाशिककरांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
थंडीचा कडाका वाढला
By admin | Updated: November 23, 2014 00:46 IST