नाशिक : ‘आठवडाभरापासून केदारनाथच्या परिसरामध्ये हिमवर्षाव होत असल्याने तपमान उणे अंशापर्यंत गेलेले. केदारनाथला पोहोच होणारे पूर्वीचे रस्ते अस्तित्वात नसल्याने नव्या पाऊलवाटा, रस्त्यांवर साचलेला बर्फाचा थर, त्यातूनही मार्ग काढत केदारनाथाचे दर्शन घडले ते याठिकाणच्या लष्करी जवानांच्या मदतकार्यामुळेच...’ या भावना आहेत केदारनाथ यात्रेला गेलेल्या नाशिकच्या सोनजे दांपत्याच्या. गेल्या वर्षी केदारनाथ यात्रेदरम्यान झालेल्या महाप्रलयानंतरच्या खाणाखुणा अजूनही केदारनाथ यात्रेदरम्यान स्पष्टपणे दिसत असल्याचे नाशिकच्या गोविंदनगरचे रहिवासी रमेश सोनजे व त्यांच्या पत्नी कल्पना सोनजे यांनी सांगितले. सोनजे दांपत्याने गेल्याच आठवड्यात केदारनाथाचे दर्शन घेतले आणि त्यानंतर हिमवर्षावात वाढ झाल्याने सदरची यात्रा बंद झाली. सोनजे दांपत्य चौधरी यात्रा कंपनीच्या माध्यमातून यात्रेला आले आहे. सून, ५१ महाराष्ट्रीयन यात्रेकरू आहेत. केदारनाथला पोहोचण्यासाठी २५-३० किलोमीटरचा पायी प्रवास त्यांना करावा लागला. जागोजागी लष्कराच्या जवानांची उपस्थिती दिसण्यापुरतीच नव्हती, तर ते प्रत्येक यात्रेकरूची काळजी घेत होते. अतिबर्फाळ रस्त्यावरून वयोवृद्ध, लहान मुले, महिलांना हे जवान पाठीवर घेऊन जात होते. सोनजे ज्या गटात होते, त्यांना एका रात्रीचा मुक्काम करावा लागल्याने लष्करी जवानांनी त्यांच्यासाठी बर्फापासून बचाव करणार्या अंथरुणाची आणि जेवणाचीही व्यवस्थाही उपलब्ध करून दिली. लष्करी जवानांच्या मदतीमुळेच केदारनाथाचे दर्शन घेता आल्याची भावना सोनजे दांपत्याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
कडाक्याची थंडी अन् जवानांची मदत
By admin | Updated: May 15, 2014 22:25 IST