शहरात मंगळवारी दिवसभर हलक्या सरींचा वर्षाव सुरू राहिल्याने जनजीवन काहीसे विस्कळीत झालेले दिसून आले. शहरातील वाहतुकीचा वेग पावसाच्या रिपरिपीने मंदावलेला होता. पावसाच्या रिपरिपीने शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमध्ये दोन दिवसांपासून वाढ झाली आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज बांधणे अवघड होत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. रस्त्यांवर वाळूमिश्रित मातीचा चिखल पसरून बहुतांश रस्ते निसरडे बनल्याने दुचाकी घसरण्याच्या घटनाही शहरात दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या. बुधवारी जिल्ह्याला हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’ दिला गेला असून, विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
--इन्फो---
तापमान घसरले; गारठा वाढला
ढगाळ हवामानामुळे शहरातील आर्द्रतादेखील वाढून ९८ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याची नोंद सकाळी करण्यात आली. ढगाळ हवामान आणि सरींचा तुरळक वर्षावाने कमाल तापमानाचा पारा मात्र घसरला. शहरात २४.५अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदविले गेले तर २२.३ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. त्यामुळे वातावरणात गारवा जाणवू लागला आहे.
--इन्फो--
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात सर्वदूर पाऊस होत आहे. त्याचा प्रभाव उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांमध्येही दिसत आहे. बुधवारी जिल्ह्यात जोरदार पावसाची श्यक्यता वर्तविली गेली आहे. नाशिकमधील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो. पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यास गंगापूर धरणाच्या जलसाठ्यात वाढ होऊ शकते.
- -