इगतपुरी : शहरातील श्री स्वामी समर्थ मंडळ, जनसेवा प्रतिष्ठान व डॉ. हेडगेवार पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पाऊले वळती स्वच्छतेकडे’ या उपक्रमांतर्गत तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या घाटनदेवी मंदिर परिसरात नवरात्रोत्सवानिमित्त सोमवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी विविध सामाजिक संस्था, शाळा व महाविद्यालयांतील ३३० विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला.इगतपुरी तालुक्याचे ग्रामदैवत व नाशिक जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या घाटनदेवी मंदिरात दरवर्षी नवरात्रात मोठी यात्रा भरते. देवीच्या दर्शनकरिता नाशिक जिल्ह्यासह ठाणे, नगर, मुंबईहून भाविक येतात. यात्रेपूर्वी मंदिर परिसराची स्वच्छता केली तर घाटनदेवी परिसर अधिक खुलून दिसेल आणि येणाऱ्या भविकांनाही प्रसन्न वाटेल हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन हा उपक्र म राबविण्यात आला. स्वच्छता मोहिमेत महात्मा गांधी शाळेच्या ११००, केपीजी महाविद्यालयाच्या ८०, पंचवटी शाळेच्या ५०, वंडरलॅण्ड शाळेच्या १०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विद्यार्थ्यांसह घाटनदेवी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी स्वच्छता केली.सकाळी तीन तास चाललेल्या स्वच्छता मोहिमेमुळे मंदिर परिसर लख्ख झाला. मोहिमेचे उद्घाटन आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते झाले. यावेळी झालेल्या कार्यक्र मात नायब तहसीलदार जितेंद्र केदारे, महिंद्रा कंपनीचे अधिकारी कैलास ढोकणे, ज्येष्ठ नागरिक संघाचे आर. जी. परदेशी, वंडरलॅण्ड शाळेचे प्राचार्य अल्थिया परेरा, पंचवटी शाळेचे प्राचार्य प्रसाद जॉन यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले.स्वच्छता मोहिमेत घाटनदेवी माता मंदिर ट्रस्ट, इगतपुरी नगर परिषद, राष्ट्रीय हरित सेना, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनी, अखिल भारतीय ब्राह्मण संघ, असीमा चॅरिटेबल ट्रस्ट, भारतीय जैन संघटना, शीतलामाता मित्रमंडळ, इच्छामणी गणेश मंडळ, आदर्श सोशल ग्रुप या सामाजिक संस्थांनी सहभाग नोंदविला.(वार्ताहर)
घाटनदेवी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम
By admin | Updated: October 12, 2015 22:59 IST