नाशिक : शहरातील गुन्हेगारीच्या घटना रोखण्यासाठी व पोलीस आणि जनतेमधील सुसंवाद वाढविण्यासाठी पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी नवीन व्हॉट््स अॅप क्रमांक (९७६२१००१०० ) जाहीर केला आहे. सदर हेल्पलाइनवर सिंघल यांचे वैयक्तिक लक्ष राहणार आहे. नाशिककरांना व्हॉट््स अॅपद्वारे थेट पोलीस आयुक्तांशी संपर्क साधता येणार आहे; मात्र कायदा सुव्यवस्थेशी निगडित ‘पोस्ट’ या क्रमांकावर करण्याचे आवाहन सिंघल यांनी केले आहे.शहर पोलिसांनी यापूर्वी व्हॉट््स अॅप आणि निर्भया पथकाची हेल्पलाइन जाहीर केली होती. ९७६२२००२०० हा पोलीस नियंत्रण क क्षाचा व्हॉट््स अॅप क्रमांक जाहीर करण्यात आला होता. तसेच निभर्यासाठी ९७६२१००१०० हा क्रमांक जाहीर करण्यात आला होता; मात्र सिंघल यांनी सदर क्रमांक व्हॉट््स अॅपशी जोडत संपूर्ण जनतेसाठी खुला केला आहे. हा क्रमांक सिंघल हे स्वत: बघणार असून, कायदा सुव्यवस्थेसंदर्भात जनतेकडून येणाऱ्या माहितीची गांभीर्याने दखल घेतली जाणार आहे. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असून, त्या व्यक्तीला कुठल्याही पोलीस ठाण्यामधून चौकशीसाठी फोनदेखील केला जाणार नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या व्हॉट््स अॅप क्रमांकावर नागरिक वाहतूक कोंडी, उघड्यावर मद्यप्राशन, टवाळखोरांचा उपद्रव, संशयास्पद हालचाली करणारे युवक, वाहने, संशयित गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रिक्षाचालक, अवैध धंद्यांच्या माहितीचे छायाचित्र, चित्रफीत, ध्वनिफीत, लघुसंदेशाद्वारे व्हॉट््स अॅपवर पाठवावेत, असे आवाहन सिंघल यांनी केले आहे. तसेच काही संकटसमयी आपत्कालीन पोलीस मदत ही सदर क्रमांकावरून उपलब्ध होणार आहे. या क्रमांकावर कुठलेही सुविचार, शुभ सकाळ, शुभ रात्री, सामान्यज्ञान अशा कुठल्याही प्रकारच्या ‘पोस्ट’ अपलोड करू नये. सदर क्रमांक २४ तास आॅनलाइन राहणार आहे. (प्रतिनिधी)
शहर पोलिसांचा ‘व्हॉट्स अॅप’ बदलला
By admin | Updated: September 7, 2016 00:49 IST